नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील एकास नोकरी लावून देण्याचे आमीष दाखवून आठ लाखात फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील संग्रामसिंग वामनसिंग रावल यांना योगेश संजयसिंग राजपूत रा.जातोडे ता.शिरपूर व भिमराव बापू पाटील रा.कर्जत, कल्याण यांनी सीआयएफमध्ये नोकरी लावून देण्याचे आमीष दाखविले. तसेच संग्रामसिंग रावल यांच्याकडून ८ लाख रुपये घेऊन नोकरी न लावून देत पैसेही परत केले नाही.
याबाबत संग्रामसिंग राजपूत यांच्या फिर्यादीवरुन सारंगखेडा पोलिस ठाण्यात योगेश संजयसिंग राजपूत व भिमराव बापू पाटील या दोघांविरुद्ध भादंवि कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भगवान कोळी करीत आहेत.








