नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी हातगाड्या लावण्यात येतात. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर पालिकेने दि.२१ एप्रिलपर्यंत अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना अतिक्रमण धारकांना दिल्या होत्या. दरम्यान, २४ एप्रिल रोजी बुलडोझर चालविण्यात येणार होते. मात्र पालिकेच्यावतीने अतिक्रमण धारकांना पुन्हा नोटीस बजावण्यात आल्या होत्या २४ तासांचा अल्टीमेटम देण्यात आला होता. त्यानंतर आज पलिकेतर्फे मोठ्या पोलीस बंदोबस्तात शहरातील १०० हून अधिक दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आले.
नंदुरबार शहरातील सार्वजनिक रस्त्यालगत केलेले अतिक्रमण, सार्वजनिक ठिकाणी हातगाड्या लावणे तसेच छोट्या टपऱ्या, ओटे, घराच्या बांधकामाच्या पायऱ्या काढून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सार्वजनिक वापराच्या रस्त्याच्या रुंदी कमी होवून वाहतूकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. रस्त्याच्या रुंदीमुळे अपघातांमध्ये देखील वाढ होत आहे.
दरम्यान याप्रकरणी विविध नागरिक व संस्थांनी पालिकेकडे अतिक्रमणाबाबत तक्रारी केल्या आहे. यापार्श्वभूमीवर नंदुरबार पालिका प्रशासन अतिक्रमण हटविण्याबाबत ॲक्शन मोडमध्ये आली आहे. दि.२४ एप्रिल रोजी अतिक्रमण हटविण्यात येणार होते. मात्र पालिका प्रशासनाच्यावतीने अतिक्रमण धारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. सदरच्या नोटीसमध्ये नोटीस प्राप्त झाल्यानंतर २४ तासाच्या आत अतिक्रमण काढून घेण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. तसेच सदरचे अतिक्रमण हटविले नाही तर अतिक्रमीत बांधकाम नगर परिषदेच्यावतीने काढून सदरचे अतिक्रमण निकाषीत करण्यात येईल व होणारा खर्च अतिक्रमण धारकांकडून वसूल करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.
दरम्यान, अतिक्रमण धारकांकडून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पालिकेची पावती घेत असून त्या आमच्याकडे आहेत. ऐनवेळी आमची जागा हिरावून घेतल्यास आम्ही रोजगार करायचा कोठे? असा सवाल उपस्थित करत पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात आली होती. यावर नंदुरबार पालिकेने अतिक्रमणधारकांची गैरसोय होऊ नये यासाठी नगर परिषदेच्या आधार बेघर निवारा केंद्रात तात्पुरत्या निवासाची सोय करण्यात आली आहे. यामुळे अतिक्रमण धारकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
आज पलिकेतर्फे मोठ्या पोलीस बंदोबस्तात मुख्याधिकारी पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी ३ वाजे दरम्यान मोहिम सुरू करण्यात आली यात शहरातील १०० हून अधिक अतिक्रमण काढण्यात आले.यावेळी शहरातील पंचायत समिती, संजय टाऊन हॉल, स्टेट बँक, खोडाई माता आदी परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले.तर अनेक अतिक्रण धारकांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढून घेतले. यावेळी शहरातील सत्ताधारी नगरसेवकाचे अतिक्रमण ही यावेळी काढण्यात आले.
अतिक्रमण हटावसाठी पालिकेचे मुख्याधिकारी पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शाखाली १ पोलिस निरीक्षक, १ सहाय्यक पोलिस निरीक्षक, ३ उपनिरीक्षक, २५ पोलिस कर्मचारी व १५ महिला पोलिस कर्मचारी अशा बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आले.यावेळी पालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
फेरीवाल्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन
नंदुरबार पालिकेतर्फे सुरु झालेल्या अतिक्रमण हटाव मोहीमेमुळे अनेकांचे व्यवसाय बंद होणार अशी भिती निर्माण झाली होती. मात्र व्यवसाय बंद होवू नये यासाठी शासनाच्या फेरीवाला धोरणांतर्गत ज्या फेरीवाल्यांना शासनाच्या योजनेखाली आर्थिक निधीची आवश्यकता आहे.अशा पात्र फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी अंतर्गत या कार्यालयाकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मुख्याधिकारी पुलकीत सिंह यांनी नगर परिषदेत संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.