नंदुरबार । प्रतिनिधी
तालुक्यातील केळी ग्रामपंचायत अंतर्गत चालू पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले निलेश पारत्या गावित, जोशदा सवलत गावित, सुंगती जितेंद्र वसावे यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी मनीषा खत्री व नाशिक अप्पर आयुक्तांनी अपात्र घोषित केले आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (ज) 3 प्रमाणे विवाद अर्ज दिलवरसिंग नाग्या गावित, मगन वश्या गावित, नरेंद्र गोरजी गावित, विष्णू संपत गावित, रमेश छगन वसावे, प्रवीण ठाकरे गावित (सर्व रा.केळी ता.नवापूर) यांनी प्रतिवादी ग्रामपंचायत सदस्य निलेश पारत्या गावित, जोशदा सवलत गावित, सुंगती जितेंद्र वसावे यांच्याविरोधात शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करत अर्ज दाखल केला होता.
यावर ग्रामपंचायत विभाग अंतर्गत जिल्हाधिकार्यांनी 29 जूलै 2022 रोजी सदस्यांना अपात्र घोषित करत निकाल जाहीर केला होता. त्यानंतर अपात्र घोषित झालेल्या सदस्यांनी नाशिक अपर आयुक्तांकडे अपील अर्ज दाखल केला होता. परंतू 29 मार्च 2023 च्या सुनावणीदरम्यान नंदुरबार जिल्हाधिकार्यांनी अपात्र ठरविलेल्या सदस्यांचा अपिल अर्ज फेटाळत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 16 निकालाच्या सूचनापत्रानुसार अपील अमान्य करत तिन्ही सदस्यांचे पद अपात्र घोषित करण्यात आले आहे.
शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून निवडणूक लढवून सदस्य प्राप्त केलेल्या केळी ग्रामपंचायतीमधील निलेश पारत्या गावित, जोशदा सवलत गावित, सुंगती जितेंद्र वसावे या सदस्यांचे पद अपात्र घोषित केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यातील एक जण उपसरपंच पदावर होते. अपात्र झालेल्या सदस्यांचे पॅनल मोडकळीस आल्याने सरपंच पदही धोक्यात आले आहे. आता प्रशासनाच्या वतीने केळी ग्रामपंचायत अंतर्गत पुन्हा निवडणुका घेऊन अपात्र सदस्यांच्या जागी नवीन सदस्य निवडण्याची प्रक्रिया पुढील शासकीय सूचनेप्रमाणे राबविण्यात येणार आहे.