नंदुरबार l प्रतिनिधी
चालू वर्षी पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची राज्यातील जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाइन प्रणालीद्वारे राबवण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार यांच्या वतीने शासनाला वेळोवेळी पारदर्शक बदल्या कराव्यात असेही निवेदन सादर करण्यात आले होते. जिल्हांतर्गत शिक्षकांच्या सहा टप्प्यांची ऑनलाइन बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्यापही कार्यमुक्तीचे आदेश न मिळाले नाहीत. एप्रिल महिन्याच्या अखेरीस शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर 30 एप्रिल पर्यंत कार्यमुक्तीची आदेश प्रशासनाने द्यावेत, अशी मागणी शिक्षक बदली अभ्यास गटाचे प्रमुख तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे ई-मेल द्वारा प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गोपाल गावीत यांनी निवेदन देण्यात आले आहे.
ऑनलाइन प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने पूर्ण झाली. प्रत्येक घटकाला विश्वासात घेण्यात आले. दुर्गम क्षेत्रातील बदल्यांबाबत काही आक्षेप होते. मात्र जास्त काळ सुगम क्षेत्रात काम केलेल्या शिक्षकांची दुर्गम क्षेत्रात बदली करण्यात आली. एकूण शिक्षकांपैकी केवळ एक टक्के शिक्षकांची दुर्गम क्षेत्रात बदली झाली आहे. बदली प्रक्रियेचे संकेतस्थळ सर्वांसाठी खुले असल्याने सर्वांना त्यातील माहिती उपलब्ध झाली. त्यामुळे कोणावरही अन्याय होण्याचा प्रश्नच नाही. बदली निर्णय सॉफ्टवेअरद्वारे घेतला जात असल्याने मानवी हस्तक्षेपाला काहीच संधी नव्हती ही महत्त्वाची बाब आहे. असेही मत जिल्हा परिषद नंदुरबार चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले आहे.
प्रशासनाने पारदर्शक बदल्या केल्याबद्दल प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावीत, जिल्हा अध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांनी प्रशासनाचे आभार मानले आहे. या बदली प्रक्रियेत नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून , पसंतीक्रमानुसार शाळा मिळालेल्या आहेत. संवर्ग १ ( दुर्धर आजार , दिव्यांग आदी ) , संवर्ग २ ( पती – पत्नी एकत्रीकरण ) , संवर्ग ३ ( अवघड क्षेत्र ) संवर्ग ४ ( सुगम क्षेत्र ) , संवर्ग ५ ( विस्थापित शिक्षक ) , संवर्ग ६ ( पेसा व अवघड क्षेत्रातील रिक्त जागा ), अशा सहा टप्प्यात शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रिया २१ मार्च २०२३ ला पूर्ण झाली. या प्रक्रियेत बदली पात्र प्रत्येक शिक्षकाला त्यांच्या लॉग इनवरून बदली आदेश प्राप्त झाले आहेत.बदल्या झालेल्या सर्व शिक्षकांनी दि.२१ मार्च २०२३ रोजी बदली झालेले स्वतःच्या पर्सनल आदेश लॉगिन वरून डाऊनलोड करून प्रिंट काढून घेतले आहेत. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व शिक्षकांच्या लॉगिनला बदली आदेश उपलब्ध करून दिले आहे.

मात्र, कार्यमुक्तीचे आदेश अद्यापही प्राप्त न झाल्याने शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जिल्हाअंतर्गत ऑनलाइन बदली केलेल्या शिक्षकांना अद्याप कार्यमुक्त केले नसल्याने शिक्षकांची चिंता निर्माण झाली आहे. शिक्षकांच्या पाल्यांचे प्रवेश प्रक्रियासह अन्य बाबी अडकल्या आहेत. त्यामुळे हे शिक्षक कार्यमुक्ती आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हाअंतर्गत ऑनलाइन बदल्या पारदर्शकपणे मानवी हस्तक्षेपाशिवाय पार पडल्या आहेत. दि. ३० एप्रिल अखेर शिक्षकांना कार्यमुक्त केले तर त्यांच्या नवीन शाळेच्या आसपास स्वतःच्या मुलांचे प्रवेश करता येणार आहेत. मुख्यालय बदलता येईल.
कार्यमुक्तीचे आदेश ते कार्यमुक्तीची कार्यवाही ही सुमारे महिनाभराची लांबलचक प्रक्रिया आहे. कार्यमुक्त झाल्यानंतरही शिक्षक बांधवांपुढे अनेक अडचणी असणार आहेत . त्यामुळे हीच प्रक्रिया दोन 30 एप्रिल पर्यंत पूर्ण केल्यास नवीन शाळेवर रुजू होणे , मुलांच्या प्रवेश प्रक्रिया राबवणे, निवासाची सोय करणे , शिक्षण धोरण राबवणे , अशा प्रक्रिया पार पाडणे सोपे जाईल. शासनाने या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा.–
गोपाल गावीत
जिल्हा अध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार.








