नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील वाहवाणीचा नोलदापाडा येथे कारवाईतील जप्त केलेला मुद्देमाल घेवून जावू नये यासाठी रस्त्यावर दगडाची रास रचून अडवणूक करुन दगडफेक करुन वाहनाचे नुकसान व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धडगाव तालुक्यातील वाहवाणीचा नोदलापाडा रस्त्यावर वन विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईतील जप्त केलेला मुद्देमाल धडगाव येथील शासकीय वाहनाने कार्यालयावर घेवून जात असतांना ईश्वर ताप्या तडवी (रा.आटविपराडा ता.धडगाव), कैलास कुरश्या पाडवी (रा.पौला पाटीलपाडा ता.धडगाव) यांच्यासह २ ते ३ जणांनी सदर रस्त्यावर दगडाची राच रचून रस्ता अडवून दगडफेक केली.
तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याबाबत वनरक्षक दिलवर फाड्या पावरा यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात भादंवि कलम ३५३, ३४१, ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आर.बी.पाटील करीत आहेत.








