नंदूरबार l प्रतिनिधी
खांडबारा -नंदुरबार रस्त्यावर नवापूर तालुक्यातील काळंबा फाट्यानजीक दोन मोटरसायकलींचा भीषण अपघात झाला असून या अपघातात नवापूर नगर पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी ठार झाल्याची घटना घडली आहे.
खांडबारा नंदुरबार रस्त्यावरील काळंबा फाट्यानजीक काल एक वाजेच्या सुमारास दोन दुचाकीचा धडकेमुळे भीषण अपघात झाला. यात विजय गोपाल पाटील( दुचाकी क्र. जी. जे. २६ एच. ३०७१) वर तर दुसरा दुचाकी स्वार विलास गावित रा. पिंपळा (खडकी) ता. नवापूर दोन्ही वाहनांची धडकेत विजय पाटील यांचा मृत्यू झाला तर विलास गावित हा जखमी झाला आहे.
दोन दुचाकींची जोरदार धडक झाल्याने दोन्ही वाहने चक्काचूर झाले असून स्कूटर स्वार गंभीर जखमी झाले होते. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू असल्याने स्थानिकांनी 108 रुग्णवाहिकेला काॅल करून पाचरण केले. 108 रूग्णवाहिकेतून उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
दोन्ही मोटरसायकलीचा अपघात नेमका कसा झाला याबाबत अजून कळू शकले नाही. यासंदर्भात नंदुरबार तालुका पोलीस तपास करीत आहे.
नवापूर नगरपालिकेचे सेवानिवृत्त आरोग्य विभागातील कर्मचारी विजय गोपाळ पाटील( वय 61) रा. सराफ गल्ली, नवापूर यांचे अपघातात निधन झाल्याने नवापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
एकीकडे अपघातात विजय पाटील यांची अपघाताची बातमी तर दुसरीकडे त्यांच्याच आवाजात नवापूर नगरपालिकेचे कर वसुलीसाठी आवाहन करताना आवाज शहरात घुमत आहे. अस्खलितपणे व मधुर अलाउंसिंग करणारे पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी यांचा निधन झाल्याने नवापूर शहरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.
विजय पाटील नवापूरहून नंदुरबार उत्तरकार्यासाठी जात असताना अपघात नंदुरबार खांडबारा रस्त्यावरील काळंबा फाटा जवळ स्कूटर व शाईन या दोन मोटरसायकलीचा अपघात झाला.या अपघातात विजय गोपाळ पाटील ठार झाले आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे.अपघात झालेल्या घटनास्थळी धोकादायक वळण असल्याने अनेक वाहन चालकांनी आपले प्राण गमावले आहे. यावर ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे.