नंदुरबार l प्रतिनिधी –
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील दहेलचा ईऱ्याडीपाडा येथील गरोदर महिलेवर उपचार न केल्याने महिलेचा व तिचा बाळाचा मृत्यू झाल्याप्रकरणी मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील दहेलचा ईऱ्याडीपाडा येथील मोनिका लालसिंग वळवी (वय २२) या गरोदर महिलेला मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होेत. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.राहूल विठ्ठल लांबोळे यांनी उपचार करणे गरजेचे असतांना महिलेवर उपचार न केल्यामुळे व निष्काळजीपणा केल्याने महिला व तिचा बाळाच्या मृत्यू झाला.
याप्रकरणी नंदुरबार जिल्हा चिकित्सक यांनी चौकशीसाठी नियुक्त केलेल्या तज्ञ समितीने जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिलेल्या चौकशी अहवालावरुन उपचारासाठी दाखल केलेल्या मोनिका वळवी यांच्यावर वेळेवर उपचार मिळाले असते तर महिला व बाळाचा मृत्यू टाळता असा असला असा निष्कर्ष सादर केला. याबाबत पोहेकॉ.राजेंद्र गावित यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात वैद्यकीय अधिकारी डॉ.राहूल विठ्ठल लांबोळे याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप आराक करीत आहेत.








