नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील पानबारा येथे ट्रॅक्टरवरुन खाली पडून मागील चाकाखाली दाबला गेल्याने १२ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील पानबारा येथील सुरेश दिवानजी गावित हे त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर (क्र.एम.एच.३९ एन २५९२) घेवून भिकाजी गावित यांच्या शेतातील गहुचे पोत भरुन परत जात होते. यावेळी सुरेश गावित यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव ट्रॅक्टर चालविल्याने ट्रॅक्टरच्या ट्रालीत बसलेला सुजल सुनिल गावित (वय १२ वर्ष) हा ट्रॅक्टरवरुन खाली पडून मागील चाकात दाबला गेल्याने त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
याबाबत सुनिल छगन गावित यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात सुरेश गावित याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.किरण वळवी करीत आहेत.