नंदूरबार l प्रतिनिधी
शहरातील सिंधी कॉलनीत बाबा गरीबदास मंदिरात सद्गुरु महाराज बाबा गरीबदास यांचा वार्षिक मेला उत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला. या उत्सव कार्यक्रमांना सिंधी समाजातील महापुरुषांसह राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. इंदौरचे खा.शंकर लालवानी यांची नंदुरबार शहरातून स्वागत रॅली काढण्यात आली. या तीन दिवशीय वार्षिक मेला उत्सवातील कार्यक्रमांना सिंधी समाजाबांधवांनी उपस्थित राहून प्रतिसाद दिला.
पूज्य बाबा गरीबदास सेवा मंडळ व पूज्य अपरसिंध पंचायत नंदुरबार यांच्या वतीने सद्गुरु महाराज बाबा गरीबदास यांचा वार्षिक मेला उत्सव घेण्यात आला. नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनीत सलग तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी सिंधी समाजातील महापुरुष पूज्य साई भरातलाल मसंद, साई सुकदेवलाल राजकोट, रेणुका माता, जेठानंद उदासी, गैताम ठाकुर आदी महापुरुषांची उपस्थिती होती. या वार्षिक मेला उत्सवाला इंदौरचे खा.शंकर लालवानी, छत्तीसगड भाजपाचे प्रदेश मीडिया प्रमुख अमित चिमनानी यांची विशेष उपस्थिती लाभली.
नंदुरबारात आगमन होताच खा.शंकर लालवानी यांची सिंधी कॉलनी परिसरातून स्वागत रॅली काढण्यात आली. तसेच भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, शिवसेनेचे नंदुरबार-धुळे लोकसभेचे संपर्कप्रमुख तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, माजी आ.शिरीष चौधरी, भाजपाचे युवा नेते डॉ.विक्रांत मोरे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडले. या वार्षिक मेला उत्सवात अखंड पाठ, हवन पुजन, सत्संग, प्रवचन, ध्वजवंदना, शोभायात्रा, भोग साहिब, पल्लब साहिब असे विविध कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांना सिंधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पूज्य बाबा गरीबदास सेवा मंडळ व पूज्य अपरसिंध पंचायत नंदुरबारच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह तरुणांनी परिश्रम घेतले.








