नंदुरबार ! प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत दिनांक २१ जुन पासुन सुरू असलेल्या कृषि संजिवनी मोहिमेअतंर्गत समशेरपुर व शिंदे ता.नंदुरबार या गावांत महाराष्ट्र ग्रामिण रोजगार हमी योजनेतंर्गत फळबाग लागवड तंत्रज्ञानाच्या प्रचार व जागरुकतेसाठी , जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर , यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका कृषि अधिकारी स्वप्निल शेळके , मंडळ कृषि अधिकारी विजय मोहिते यांच्या उपस्थितीत फळबाग लागवडीचा शुभारंभ करण्यात आला .
नंदुरबार तालुक्यासाठी सन २०२१-२२ या वर्षासाठी महाराष्ट्र ग्रामिण रोजगार हमी योजनेतंर्गत फळबाग लागवडीचे सुमारे ५०० हेक्टर क्षेत्र लक्षाक ठेवण्यात आले आहे . त्यापेकी ४६२ हेक्टर क्षेत्रास प्रशासकीय मजुरी प्राप्त झाली आहे.त्याअनुषंगाने समशेरपुर येथिल प्रगतशिल शेतकरी राजाराम इसन पटेल व शिंदे येथिल राहुल वाघ या शेतक – यांचा प्रक्षेत्रावर आंबा कलमांची लागवड तालुका कृषि अधिकारी स्वप्निल शेळके यांच्या हस्ते करण्यात आली.त्यावेळी महाराष्ट्र ग्रामिण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड , गांडुळ युनिट , नॅडेप युनिट , शेततळे या घटकांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले . मंडळ कृषि अधिकारी विजय मोहिते यांनी माती परीक्षण आधारीत पिक निहाय खत व्यवस्थापन , सोयाबिन पिकासाठी रुंद सरी वरंबा बिबिएफ तंत्रज्ञानाच्या वापरामुळे होणारे फायदे व बांधावर खत पूरवटा मोहिमेबद्दल सखोल मार्गदर्शन करतांना मुलस्थानी जलसंधारणासाठी मृतसरी काढणे , उताराला आडवी पेरणी , वाफे पध्दत या विषयी सखोल मार्गदर्शन केले . तसेच कृषि पर्यवेक्षक करणसिंग गिरासे यांनी महाराष्ट्र ग्रामिण रोजगार हमी योजनेतंर्गत बांधावर व सलग फळबाग लागवडीचे हेक्टरी आर्थिक मापदंड व अंमलबजावणीची कार्यपध्दती तसेच गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या विषयी मार्गदर्शन केले . सदर मोहीमेत शेतकरी गटांचे प्रतिनिधी , प्रगतीशिल शेतकरी यांनी भाग घेतला . मोहीम यशस्वतेसाठी कृषि सहाय्यक सुनिल पवार , सुधिर वाघमारे , प्रकाश वसावे , उत्सव पाटील , राजेंद्र गिरासे , हेमंत लाड , पंकज धनगर , बी.सी. बोरसे , विदया कुवर , नम्रता वळवी , तसेच प्रगतशिल शेतकरी राजाराम इसन पटेल , राहुल वाघ यांनी परीश्रम घेतले .