नंदूरबार l प्रतिनिधी
अंगणवाडी सेविका अलका वळवी ह्या धडगाव तालुक्यातील तोरणमाळ विभागातील जुगणीच्या हिरणीचापाडा येथील रहिवासी केंद्रात अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होती. गेल्या तीन वर्षापासून तिला कामाचा कोणताही मोबदला मिळाला नव्हता. सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मानसिक त्रास दिला जात होता. तसेच गावातील नागरिकांनाही तिच्याबद्दलची चिथावणी देऊन त्रास द्यायला लावला.
अशा विविध त्रासांमुळे कंटाळून दुचाकीवरून घरी जात असताना घाटात उडी घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी
धडगाव प्रकल्प अधिकारी किशोर एस पगारे, रवीण हांद्या वळवी, दारासिंग सोन्या वळवी, सरलाबाई रवीन वळवी, मालतीबाई दारासिंग वळवी या पाच जणांविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परंतु गेल्या पंधरा दिवसापासून पोलिसांनी आरोपींना पाठीशी घालत अटक करून कायदेशीर कारवाई केलेली नाही. सदर आरोपींना पोलिसांनी अटक करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांकडून केली जात होती परंतु पोलीस याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे आज नातेवाईकांनी थेट नंदुरबार पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून मोर्चा काढत निवेदन सादर केलं आहे.
या निवेदनानंतर पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच त्यांना मिळालेला जामीन देखील नामंजूर करू व आरोपींना अटक करू अशी ग्वाही दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणात कायदेशीर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष राहुल पावरा यांनी दिले आहे.