प्रकाशा | वार्ताहर
प्रकाशा येथे दि.13 सप्टेंबर रोजी तापी घाटावर आजोबांच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या सामूद्रे कुटुंबातील दोघे भाऊ अंघोळीला गेले असतांना एक जण वाहून गेला तर दुसर्याला वाचविण्यात नावाडयांना यश आले. दरम्यान राज रविन सामूद्रे याचा मुतदेह दोन दिवसानंतर शोधण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकाशा ता.शहादा येथील सिध्दार्थनगरमध्ये राहणारे रविन भिमा सामुद्रे यांच्या वडीलांचे काही दिवसांपुर्वी निधन झाले. त्यामुळे ते परिवारासह पुजाविधी व मुंडनाच्या कार्यक्रमासाठी दि. 13 सप्टेंबर रोजी प्रकाशा येथील घाटावर आले होते. कार्यक्रम सुरु असतांना त्यांची दोघे मुले राज सामुद्रे व गौतम सामुद्रे हे आंघोळीसाठी तापी नदीच्या पात्रात उतरत असतांना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याच्या प्रवाहासोबत राज रविन सामुद्रे (वय १६) हा वाहून गेला तर गौतम सामुद्रे हा पाण्यात वाहत असतांना त्याला नावाडी रमेश सना ठाकरे व जयसिंग ठाकरे यांनी काही अंतरावर जावून पकडले. त्यामुळे त्याला वाचविण्यात यश आले आहे. गौतम यास उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. राज रविन सामुद्रे हा पुराचा पाण्यात वाहून गेला.
त्याला शोधण्यासाठी दिवसभर शोधमोहीम सुरू होती.राज सामुद्रे यांच्या शोधासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते.आज दि.15 सप्टेंबर सकाळी प्रकाशाच्या पश्चिमेला 4 किमी अंतरावर राम टेकडी परिसरात एनडीआरएफच्या पथक शोध घेत असताना त्यांना राज रविन सामुद्रे याचा मृतदेह आढळला .याबाबतची माहिती राज याच्या कुटुंबीयांना कळविण्यात आली.माहिती कळताच कुटुंबीय व नातेवाईकांनी त्या ठिकाणी धाव घेतली.दुपार पर्यंत डॉक्टर नसल्याने शव विच्छेदन करण्यात आले नाही.त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले होते.