नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव व गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ शिंदे ता.जि.नंदुरबार आयोजित जागतिक मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेची प्राथमिक फेरी उत्साहात संपन्न झाली. या साहित्य अभिवाचन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत शहादा येथील ‘अभिव्यक्ती’ या संस्थेने प्रथम क्रमांक मिळवून बाजी मारली.
येथील श्रीमती ही.गो.श्रॉफ माध्यमिक विद्यालयात जागतिक मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन हि.गो.श्रॉफ माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या सौ.सुषमा शाह यांनी नटराज पूजन करून केले. यावेळी जळगाव येथील रंगकर्मी तथा बाह्य परीक्षक चिंतामण पाटील, परीक्षक प्रा.डॉ.माधव कदम, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी, आयोजक तथा नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर आदी उपस्थित होते.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना प्राचार्या सुषमा शाह म्हणाल्या की, अभिवाचन स्पर्धेच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यात नाट्य चळवळीसाठी पोषक वातावरण निर्माण होईल, यात शंका नाही. यावेळी गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर यांनी साहित्य अभिवाचन स्पर्धेची भूमिका समजावून सांगितली. तर ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील यांनी स्पर्धेचे नियम व महत्त्व समजावून सांगितले. जागतिक मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी जिल्ह्यातून आठ संघांनी सहभाग नोंदविला होता. यापैकी शहादा येथील ‘अभिव्यक्ती’ या संस्थेची ‘मृगया’ ही कथा प्रथम आली. याचे दिग्दर्शन विष्णू जोंधळे यांनी केले तर यात विष्णू जोंधळे यांच्यासह सौ.आशा चित्ते यांनी सहभाग घेतला होता.
सदर संस्था चाळीसगाव येथे होणार्या अंतिम फेरीत सहभाग घेऊन नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याचप्रमाणे इतर सहभागी संघातून उत्तम वाचक अभिनय प्रमाणपत्र पुढील कलावंतांना देण्यात आले – सलोनी दिनेश माळी (कोणी एके काळी), राहुल पंडितराव ठाकरे (मारवा), कृष्णा सुनील लांडगे (रक्ताचा निवाडा), जितेंद्र दीपक पाटील (संगीत चिवडामणी), धर्मेंद्र भानुदास भारती (विहीर), सुवार्ता सुधाकर धिवरे (अमिताभ-चिंटू चे चार दिवस) यांचा समावेश आहे. सदर कलावंतांना सिने अभिनेते तथा पत्रकार रणजीत राजपूत, ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, प्रा.डॉ.माधव कदम, नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे संयोजन नागसेन पेंढारकरसह डॉ.चारुता गोखले, राजेश जाधव, विश्वजीत क्षीरसागर, जितेंद्र खवळे, तुषार सांगोरे आदींनी केले होते.








