नंदुरबार l प्रतिनिधी-
भालेर येथील का. वि. प्र. संस्था संचलित श्रीमती क.पु. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘विश्व आदिवासी गौरव दिन’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली तसेच कार्याध्यक्ष विजय बोरसे यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, इतिहास आणि अस्मिता यांचा गौरव करणाऱ्या या कार्यक्रमास परिसरातील आदिवासी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून जाण्याभाऊ भील यांच्या हस्ते क्रांतिवीर बिरसा मुंडा व तंट्या भिल यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रमुख पाहुणे म्हणून पंडित भील, शिवा भील, शंकर भील, करण भील, आकाश ठाकरे, संजय भील, शंकर ठाकरे आणि रोहिदास ठाकरे उपस्थित होते. नगावतीशी, भालेर, वडवद आदी परिसरातील आदिवासी समाजबांधवांची लक्षणीय उपस्थिती कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली.
संस्थेचे अध्यक्ष श्री. पाटील, विजय बोरसे यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देत आदिवासी समाजाच्या समृद्ध परंपरा, संस्कृती आणि योगदानाबद्दल गौरवोद्गार व्यक्त केले. भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनीही आदिवासी समाजबांधवांना शुभेच्छा देऊन त्यांच्या सांस्कृतिक वारशाला अभिवादन केले.
कार्यक्रमास प्राचार्य, पर्यवेक्षक तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मागासवर्गीय कन्या छात्रालयातील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या पारंपरिक आदिवासी नृत्याने कार्यक्रमात सांस्कृतिक रंगत आणली. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या शिबली नृत्याने आदिवासी समाजाच्या लोककला, नृत्यपरंपरा आणि सांस्कृतिक वैभवाचे मनोहारी दर्शन घडविले. उपस्थितांनी त्यांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. व्ही. ईशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि कर्मचारीवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.
आदिवासी समाजाच्या इतिहासाचा गौरव, सांस्कृतिक परंपरांचे जतन, सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा हा ‘विश्व आदिवासी गौरव दिन’ कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.











