नंदूरबार l प्रतिनिधी
महामार्गावर जबरी चोरी करणारे ३ संशयीत आरोपींना १२ तासात शहादा पोलीसांनी अटक केली असुन त्यांच्या ताब्यातुन ५६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.
याबाबात अधिक माहिती अशी कि, दि. २८ जानेवारी रोजी प्रताप बुच्या पावरा रा. साईबाबा नगर, शहादा हे त्यांच्या शेलकुई ता. धडगांव येथे त्यांच्या खाजगी कामानिमीत्त गेले होते. दि.२९ जानेवारी रोजी ते शेलकुई ता. धडगांव येथून परत येवून त्यांच्या घरी जात असतांना रात्री १०.३० वाजेच्या सुमारास शहादा बायपास रस्त्यावर असलेल्या मिराप्रताप लॉन्सजवळ त्यांच्या पाठीमागून मोटार सायकलवर आलेल्या ३ अज्ञात इसमांनी त्यांना थांबवून त्यांच्या पॅन्टच्या खिशातून ८ हजार रुपये रोख, १० हजाराचा मोबाईल व त्यांची मोटार सायकल (क्र. एम.एच.- ३९ Aएई.-४९७६) असा एकुण ५८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल धक्काबुक्की करुन जबरीने हिसकावून नेला म्हणून म्हणून शहादा पोलीस ठाण्यात येथे भा.द.वि. कलम ३९२,३४ प्रमाणे ३ अज्ञात आरोपीतांविरुध्द् गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्याचे वेगवेगळे पथक तयार करुन गुन्हा घडकीस आणून गुन्हयातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करुन आरोपीतांवर कठोर कारवाई करणेबाबत आदेशीत केले.
शहादा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे व शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार शहादा व आजू-बाजूच्या परिसरात घडलेल्या गुन्ह्याबाबत माहिती घेत असतांना नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सदरची जबरी चोरी ही सालदार नगर परिसरात राहाणारे भूपेश सुधाकर यांनी त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने केली असून ते सद्या त्याच परिसरात फिरत आहेत. सदरची माहीती पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे यांना कळवून मिळालेल्या बातमीमधील संशयीतांना ताब्यात घेवून माहीतीची खात्री करुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
शहादा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळाचा आजु-बाजूचा परिसर पिंजून काढला. त्याच दरम्यान नवीन बस स्थानकाच्या मागे असलेल्या काटेरी झुडपातून दोन इसम पळतांना दिसले, म्हणून पथकाला संशय आल्याने त्यांचा पाठलाग करुन सुधाकर सुभाष माळी, विपुल ऊर्फ भूपेश छोटू कुंवर दोन्ही रा. सालदार नगर, शहादा यांना घेवुन विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचा एक साथीदार योगेश गुरव याच्या मदतीने केला असल्याची सविस्तर हकिगत सांगितली. तसेच त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील जबरीने हिसकावून घेतलेले ६ रुपये रोख हस्तगत करुन गुन्ह्यातील मोटार सायकल व मोबाईल त्यांचा साथीदार योगेश गुरव याच्याकडे असल्याचे सांगितल्याने शहादा पोलीस ठाण्याच्या पथकाने योगेश पंडित गुरव रा. सालदार नगर शहादा यास त्याच्या घरुन ताब्यात घेवून त्याच्या ताब्यातून १०,०००/- रुपये किमतीचा मोबाईल व त्यांची मोटार सायकल असा एकुण ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन त्यास ताब्यात घेतले.
शहादा पोलीस ठाण्याच्या पथकाने महामार्गावरील जबरी चोरीचा अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा १२ तासात उघडकीस आणून गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल हस्तगत केल्याने पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी हा गंभीर गुन्हा उघडकीस आणणार्या शहादा पोलीस ठाण्याच्या पथकास रोख बक्षिस जाहीर केले.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे, सहा. पोलीस निरीक्षक गणेश पवार, पोलीस अंमलदार मुकेश राठोड, अनिल पावरा, दिनकर चव्हाण, भरत उगले यांच्या पथकाने केली आहे.