नंदुरबार | प्रतिनिधी
सेबी अंतर्गत होणारे कापूस, सोयाबीन, तुर, तांदुळ व इतर शेतीमालाचे वायदा बाजाराची बंदी त्वरीत केंद्र सरकारने मागे घ्यावी, अन्यथा आम आदमी शेतकरी संघटनेतर्फे ५ फेब्रुवारी २०२३ पासून महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चे, आंदोलन, रास्तारोको यासारखे लोकशाही मार्गाने निषेध नोंदविला जाईल, तसेच जोपर्यंत केंद्र सरकार वायदे बाजाराची बंदी उठवत नाही व शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु राहिल, अशी माहिती आम आदमी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष बिपीन पाटील यांनी पत्रपरिषदेतून दिली.
यावेळी पाटील पुढे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कपाशी, सोयाबीन, हरभरा, तुर इत्यादी पिके घेतली जातात. त्यात मराफवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात वरिल पिके प्राधान्यक्रमाने घेतली जातात. ज्यावेळी शेतमाल तयार होवून बाजारात विक्रीस शेतकरी आणतो, त्यावेळेस अचानक केंद्र सरकार व्यापारी धार्जिणे निर्णय घेवून शेतकर्यांच्या उत्पादित केलेल्या मालाचे भाव पाडण्याचे काम करते. गेल्या वर्षी २०२२ मध्ये महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टी पिडीत झाला. त्यात मोठ्या पिकांचे नुकसान झाले. अशावेळी कापूस, सोयाबीन सारखे पिकांचे नुकसान झाले. त्यातून शेतकर्यांच्या हातात कमी प्रमाणात शेतमालाचे उत्पादन मिळाले. अशावेळी बाजारात शेतमालाला चांगला भाव मिळाला असता तर कमी झालेल्या उत्पादनाची भर भरुन निघाली असती.
परंतू केंद्र सरकारने परदेशातून माल शून्य टक्के आयात कर लावून कापूस आयात करण्याचे धोरण अवलंबून शेतकर्यांचे नुकसान केल्याचा आरोपही करीत पाटील यांनी शासन धोरणाचा निषेध करीत असल्याचे सांगितले. यावेळी ते पुढे म्हणाले, शेतकर्यांच्या शेतमालावर सेबी अंतर्गत होणारे वायदे एक वर्षासाठीबंद करुन सरकारने अजून मेलेल्या शेतकर्यांना मारण्याचे काम अवलंबविले असून आम आदमी शेतकरी संघटना ते कदापिही सहन करणार नाही. सेबी अंतर्गत होणारे कृषि मालाचा वायदा बाजाराची बंदी त्वरीत केंद्र सरकारने मागे घ्यावी, अन्यथा आम आदमी शेतकरी संघटना दि. ५ फेब्रुवारी २०२३ पासून महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चे, आंदोलन, रास्तारोको यासारखे लोकशाही मार्गाने निषेध नोंदविला जाईल,
तसेच जोपर्यंत केंद्र सरकार वायदे बाजाराची बंदी उठवत नाही तोपर्यंत शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु राहिल, असा इशाराही पाटील यांनी पत्रपरिषदेतून दिला. यावेळी वेळी धुळे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील, सावळीराम करे, नंदुरबार तालुका जितेंद्र पाटील, अधिकार पाटील, योगेश पाटील आदी उपस्थित होते.








