नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील शेल्टी येथील एकाकडून शेती गहाण खत करुन आलेल्या पिकाच्या मोबदल्यात प्रतिवर्ष ७० हजार देण्याचे आमीष दाखवून १० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी शिरपूर तालुक्यातील भरवाडे येथील एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शिरपूर तालुक्यातील भरवाडे येथील राजेंद्र उर्फ गणेश नरोत्तम पाटील याने त्याची भरवाडे येथील गट क्र.६९/०१ शेती गहाण खत करुन शहादा तालुक्यातील शेल्टी येथील सुभाष लिमजी पाटील यांना पिकाच्या मोबदल्यात प्रतिवर्ष ७० हजार रुपये देण्याचे आमीष दाखविले. तसेच राजेंद्र पाटील याने सुभाष पाटील यांच्याकडून दि.२८ जुलै २०१७ रोजी ७ लाख ५० हजार रुपये व दि.७ डिसेंबर २०२१ रोजी २ लाख ५० हजार रुपये असे एकूण १० लाख घेवून सुभाष पाटील यांना प्रतिवर्ष ७० हजार रुपये व शेती माल न देता फसवणूक केली. याबाबत सुभाष पाटील यांच्या फिर्यादीवरुन सारंगखेडा पोलिस ठाण्यात राजेंद्र उर्फ गणेश पाटील याच्याविरोधात भादंवि कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भगवान कोळी करीत आहेत.








