शहादा l का.प्र.
अपघाताची अनेक कारणे असतात.अपघात मुद्दाम कोणीही करत नाही.असे असले तरी अपघात टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रा. एस. ए. खेडकर यांनी रस्ते सुरक्षा पंधरवाड्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना केले.
राज्य परिवहन महांडळातर्फे दि. 11 ते 25 जानेवारीपर्यंत रस्ते सुरक्षा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. शहादा आगारात या उपक्रमाचे उद्घाटन आय. टी.आय.चे प्रा. एस. ए. खेडकर यांचे हस्ते बुधवारी करण्यात आले. आगार प्रमुख योगेश लिंगायत यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास प्रवासी संघटनेचे प्रा. रविंद्र पंड्या, शहादा तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सुनील सोमवंशी, स्थानक प्रमुख संजय कुलकर्णी, सहाय्यक वहातुक निरीक्षक संतोष वाडिले, आर. जे. मिर्झा, वरिष्ठ लिपिक विलास पाटील, सुरेश पाटील आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी एस. टी. कर्मचाऱ्यांना प्रा. खेडकर यांनी अपघात होण्याची कारणे आणि अपघात होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. प्रा. रविंद्र पंड्या यांनी चुकीच्या पध्दतीने व चुकीच्या ठिकाणी टाकलेले गतीरोधकही अपघातास आमंत्रण देतात असे सांगून गतिरोधक व रस्त्यातील खड्ड्यांवरुन बस चालविण्याची कसरत चालकांना करावी लागते असे सांगितले. सुनील सोमवंशी यांनी एस. टी.ला 75 वर्षे पूर्ण झाल्याचे सांगून या 75 वर्षात एस. टी. ने प्रवाशांचा विश्वास संपादन केला आहे. आज प्रवासासाठी अनेक पर्याय असले तरी प्रवाशांचा एस. टी. वर विश्वास कायम असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक योगेश लिंगायत यांनी केले तर सुत्रसंचलन संजय कुलकर्णी यांनी केले. संतोष वाडिले यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास शहादा आगारातील चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक पवार इत्यादी उपस्थित होते.








