नंदुरबार l प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर नंदुरबार पोलीस दलातर्फे तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दि. ९ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून दि. २० सप्टेंबर रात्री १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ लागू करण्यात आले आहे . गणेशोत्सव काळात नियमांचे भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी दिला आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गणेशोत्सवानंतरच नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील पदभार स्वीकारणार आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात आज मोठ्या उत्साहात गणरायाची स्थापना करण्यात आली.जिल्ह्यात यंदा 426 सार्वजनिक गणेश मंडळांनी स्थापना केली आहे. तर 232 खासगी गणेश मंडळ व 108 एक गाव एक गणपती ची शांततेत स्थापना करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाने विविध नियमावली जाहिर केली आहे.जिल्ह्यात गणेश उत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली 1 अप्पर पोलीस अधीक्षक, 4 उपविभागीय पोलीस अधिकारी, 20 पोलीस निरीक्षक, 74 पोलीस उपनिरीक्षक तसेच सहाय्यक निरीक्षक, 355 पुरुष पोलीस कर्मचारी, 141 महिला पोलीस कर्मचारी, 500 पुरुष होमगार्ड, 100 महिला होमगार्ड, 7 स्ट्रायकिंग फोर्स, 2- 2 आर. सी.बी./ जी.आर. टी. प्लाटून, 1 एस.आर.पी.कंपनी असा जिल्ह्यात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.गणेश उत्सव काळात नियमांचे भंग करणाऱ्यांवर कड्क कारवाई करण्यात येईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी सांगितले.
या कालावधीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये , तसेच सार्वजनिक ठिकाणी वर्तणूकीबाबत , वाद्य वाजविणे व सभेचे आयोजन , त्याठिकाणी रस्ते निश्चित करण्याबाबत , लाऊड स्पीकर वापरणेबाबत योग्य निबंध व निर्देश देण्याचे अधिकार नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहे . असे जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले आहे . सार्वजनिक ठिकाणी त्यातील लोकांच्या वागणूकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार तसेच धार्मिक पूजास्थानाच्या जवळ लोकांच्या वागणूकास निबंध घालण्याचे अधिकार , सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजवणे , गाणी गाणे , ढोल ताशे वाजवणे इत्यादीवर निबंध घालण्याचे अधिकार , रस्ते व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था टेवण्यासाटी निर्देश देण्याचे अधिकार , सार्वजनिक ठिकाणी , रस्त्यावर लाऊड स्पीकर वाजवण्यावर निबंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार , तसेच कलम ३३ , ३५ ते ४० व ४५ मुंबई पोलीस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सूचना देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत . दरम्यान , सदर आदेश लागू असताना सभा , वाद्य वाजवणे , लाऊड स्पीकर वाजवणे , घोषणा देणे , संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घ्यावी . तसेच सर्व याबतीत पोलीस ठाणे अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे , अशा सूचना देण्यात आल्या आहेत .दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गणेशोत्सवानंतरच नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील पदभार स्वीकारणार आहेत.