नंदुरबार l प्रतिनिधी
सोशल मीडियावर संदीप जाधव, नावाच्या मुलाचे इंडियन आर्मीचे नियुक्ती पत्र आले आहे. परंतू त्याच्यावर चुकीचा पत्ता असल्यामुळे ते धुळे पोस्ट ऑफीसमध्ये पडले असल्याचा संदेश खोटा असल्याची माहिती धुळे विभाग, प्रवर अधिक्षक डाकघर, प्रताप सोनवणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर संदीप अशोक जाधव, नावाच्या मुलाचे इंडियन आर्मीचे नियुक्ती पत्र आले आहे. परंतू त्यावर चुकीचा पत्ता असल्यामुळे ते धुळे पोस्ट ऑफीसमध्ये पडले आहे. तो मुलगा भेटल्यावर नितीन राऊत (पोस्टमन) 8149774200/ 7276418893 वर संपर्क करा. हा संदेश त्या मुलापर्यंत पोहचला पाहिजे म्हणून कृपया हा संदेश जास्तीत जास्त शेयर करा. अशा प्रकारचा संदेश सोशल मीडीयावर मोठया प्रमाणावर प्रसारीत होत आहे.
हा संदेश फेक / बनावट असून अशा प्रकारचे कोणतेही टपाल धुळे डाक विभागात आलेले नाही. तसेच उल्लेख केलेला भ्रमणध्वनी क्रमांक बंद असून नितीन राऊत नावाचा कोणताही व्यक्ती पोस्टमन म्हणून धुळे विभागात कार्यरत नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा बनावट संदेशाकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन धुळे विभाग, प्रवर अधिक्षक डाकघर, प्रताप सोनवणे यांनी केले आहे.








