नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे चैन स्नॅचिंग करणार्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तालुक्यातील इंद्रीहट्टी येथुन अटक केली असुन तीन लाखांचा मुद्देमालासह दोन गुन्हे उघड करण्यात यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, १२ डिसेंबर रोजी रोजी दुपारी ४ वा. सुमारास नंदुरबार शहरातील जाणता राजा चौक ते विमल हाऊसिंग सोसायटी दरम्यान जयश्री चंपालाल चौधरी रा. मातोश्री नगर, जाणता राजा चौक, नंदुरबार हे रस्त्याने पायी फिरत असतांना एक अनोळखी मोटार सायकलवरील दोन इसमांनी त्यांच्या गळ्यात असलेले १ लाख २० हजार रुपये किमतीचे ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र जबरीने हिसकावून नेले म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीतांविरुध्द् गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दि. १७ डिसेंबर रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, नंदुरबार शहरातील जाणता राजा चौकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र चोरणारा इंद्रीहट्टी ता.जि. नंदुरबार येथील परशा व त्याचा एक साथीदाराने मिळून केलेली असून परशा व त्याचा साथीदार त्याच्या घरी आलेला आहे. सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कळवल. पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ एक पथक तयार करुन हंद्रीहट्टी येथे रवाना केले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हंद्रीहट्टी गावात जावून दोन्ही आरोपीतांचा शोध घेतला असता, एका घराच्या अंगणात लिंबाच्या झाडाखाली दोन वेगवेगळ्या मोटार सायकलवर दोन इसम गप्पा करीत असतांना दिसून आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत हुशारीने त्यांच्या आजू-बाजूला सापळा रचला, परंतु पथक त्यांच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी मोटार सायकल तेथेच टाकून तेथून पळ काढला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका संशयीत इसमास पाठलाग करुन ताब्यात घेतले परंतु एक संशयीत अंधाराचा फायदा घेवून पळून गेला. ताब्यात घेतलेल्या संशयीतास नाव गाव विचारले असता परशा ऊर्फ परशराम चैत्राम भिल रा. इंद्रीहट्टी ता.जि. नंदुरबार असे सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेला परशराम भिल यास नंदुरबार शहरातील जाणता राजा चौक येथे घडलेला गुन्हा व त्यातील मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता सदरचा गुन्हा त्याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने व जबरीने चोरलेले सोन्याचे मंगळसूत्र हे निजामपूर येथील एका सराफ व्यावसायीकाकडे गहाण ठेवल्याचे सांगितले. त्याबाबत निजामपुर ता.साक्री जि. धुळे येथील सराफ व्यावसायीकाकडे विचारपूस केली असता ४ ते ५ दिवसापूर्वी परशराम भिल व त्याच्या सोबत एक अनोळखी इसम हे त्यांच्याकडे येवून त्यांना औषधोपचारासाठी पैशांची आवश्यकता आहे, असे खोटे सांगून अंदाजे ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र त्यांच्याकडे ७० हजार रुपयांत गहाण ठेवून गेल्याचे सांगितले. त्यामुळे निजामपूर येथील सराफ व्यावसायीकाने ते सोन्याचे मंगळसुत्र पथकाकडे परत दिले.
ताब्यात घेण्यात आलेला परशराम भिल यास इतर मालमत्तेविरुध्द्चे ना उघड गुन्ह्यांबाबत विचारपूस केली असता, परशराम भिल व त्याच्या साथीदाराने मिळून ७ ते ८ दिवसापूर्वी दुपारच्या वेळी नंदुरबार शहरातील डी.मार्ट शॉपींग मॉल समोरील रोडवर एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे पॉलीश असलेली बेन्टेक्सचे मंगळसुत्र जबरीने हिसकावून घेतले होते, परंतु हिसकावून घेतलेले मंगळसुत्र हे सोन्याचे पॉलीश असलेले बेन्टेक्स धातूचे असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ते फेकून दिले बाबत हकिगत सांगितली. त्याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३९३ प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
ताब्यात घेण्यात आलेला संशयीत आरोपी परशा ऊर्फ परशराम चैत्राम भिल व गुन्ह्यातील १ लाख २० हजार रुपये किमतीचे ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र व १ लाख ६० हजार रुपये किमतीच्या गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटार सायकली असा एकुण २ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन गुन्ह्याचे पुढील तपासकामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. तसेच गुन्ह्यातील फरार आरोपीताचा शोध घेणेसाठी पथके तयार करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी ही नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस नाईक राकेश मोरे, बापु बागुल, विशाल नागरे, मोहन ढमढेरे, विकास कापुरे, पोलीस कॉन्सटेबल अभय राजपुत, आनंदा मराठे, यशोदिप ओगले यांच्या पथकाने केली आहे.








