नवापूर l प्रतिनिधी
नवापूर पोलीस ठाण्याचे लॉकअप तोडून दरोड्याच्या गुन्ह्यातील बंदी असलेले पाच आरोपी खिडक्या तोडून दि.५ रोजी फरार झाल्याची घटना घडली होती. फरार झालेला एका आरोपीला उच्छल (गुजरात) पोलिसांनी पकडले होते.महाराष्ट्र व गुजरात राज्यातील सीमावर्ती भागात नंदुरबार पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली असून लॉकप तोडून फरार झालेले उर्वरित चार आरोपींच्या शोध आज दुसर्या दिवशी ही सुरू आहे.
नवापूर तालुक्यातील कोठडा रस्त्यावर दरोड्याच्या गुन्हयाखाली नवापूर पोलीसांनी हैदर ऊर्फ इस्राईल ईस्माईल पठाण (वय २० वर्षे, रा.कुंजखेडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद), इरफान ईब्राहीम पठाण (वय ३५, रा.ब्राम्हनी- गराडा, ता.कन्नड), युसूफ असिफ पठाण (वय २२, रा.ब्राम्हनी गराडा, ता.कन्नड, जि.औरंगाबाद), गौसखों हानिफखॉ पठाण (वय ३४, रा.ब्राम्हनी- गराडा, ता.कन्नड, जि.औरंगाबाद),
अकिलखों ईस्माईलखॉ पठाण (वय २२, रा.कठोरा बाजार, ता.भोकरदन, जि. जालना) या पाच संशयीतांना त्यांच्या स्कॉर्पिओ वाहनासह ताब्यात घेतले होते. त्यांच्या वाहनामध्ये हत्यारे, मिरची पावडर आढळलेे. त्याना पुरुष लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, काल सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास लॉकअपच्या मागच्या भिंतीला असलेल्या लाकडी खिडकीची गज तोडून ते पाचही आरोपी फरार झाले. खिडकीतून उड्या मारत चड्डी बनीयनवरच पोबारा काढत हे आरोपी ऊसांच्या शेतामध्ये फरार झाले होते.
दरम्यान तापी जिल्हयातील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने या फरार असलेल्या पाच पैकी एका आरोपीस पकडले होत. आज दुसर्या दिवशी महाराष्ट्र व गुजरात राज्यातील सीमावर्ती भागात नंदुरबार पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती.नंदुरबार एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरण खेडकर, नवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ,उपनिरीक्षक,अशोक मोकळ,मनोज पाटील यांच्यासह एलसीबीचे पोलीस कर्मचारी गुजरात राज्यातील उच्छल, सुंदरपुर,होलीपाडा ,माणिकपूर भरवाडफळी या भागात रात्रीपासून ग्रस्त ठेवून त्या चार आरोपींच्या शोध घेत आहे.
मात्र आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत या चार पैकी एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही., या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.गुजराथ राज्यातील उच्छल व महाराष्ट्र हद्दील नवापूर या सिमा भागावर पोलिस प्रत्येक वाहणाची कसुन चौकशी करण्यात येत आहे.यात दि ५ रोजी पकडला गेलेला आरोपी हैदर उर्फ इस्त्राईल पठाण (वय २०) रा कुंजखेडा ता.कन्नड,जि. औरंगाबाद याला आज नवापूर न्यायलयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.