नवापूर l प्रतिनिधी
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीसां सोबत होमगार्ड यांची जबाबदारी महत्त्वाची असते.पण होमगार्डच चोरी करू लागले तर? तुम्ही कधी याचा विचार केलाय का? मात्र,असाच एक धक्कादायक प्रकार सध्या समोर आलाय. ज्यामध्ये होमगार्डच चोर निघाल्याचं पहायला मिळतंय.
नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा सुमित बिअर शॉपी मध्ये गल्ल्यातून १८ हजार रुपये लंपास केल्याची घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.या अनुषंगाने बिअर शाॅपिचे संचालक सुमित गावित यांनी नवापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानंतर नवापूर पोलीसांनी त्याचा शोध घेतला अवघ्या तीन तासात संशयित आरोपीला नवापूर पोलिसांनी गुजरात पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. गुजरात राज्यात पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ,योगेश थोरात, गुमानसिंग पाडवी,दिनेश वसुले यांच्या पथकाने ससा गावात जाऊन शोध घेतला असता,तो पोलीसांना पाहून मोटरसायकलीवरून पळत असताना पोलीसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेऊन नवापूर पोलीस ठाण्यात आणले.सुमित बियर शाॅपीतून 18 हजार चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुजरात राज्यातील ससा या गावातील संशयित आरोपी ऐलिम ईश्वरभाई गामीत असल्याचे समोर आले आहे. सदर संशयित आरोपी गुजरात राज्यातील उच्छल पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत असल्याची माहिती उच्छल पोलीस ठाण्यातील पीएसआय एन.जी.पांचाळ यांनी दिली. कुंपणच शेत खात असेल तर विश्वास तरी कोणावर ठेवावा असा सवाल उपस्थित होत आहे.