नंदूरबार l प्रतिनिधी
26/11 हल्ल्यातील शहीदांना नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे श्रध्दांजली व संविधान दिनानिमित्त उद्देशिका वाचन करण्यात आले.
दि. 26/11/2008 रोजी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेशी संबंधीत अतिरेक्यांनी भ्याड केला. या हल्ल्यात सुमारे 163 भारतीय व 34 परकीय निरपराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. अंदाजे 30 तास चाललेल्या हल्ल्यात नागरिकांचा जीव वाचवितांना तसेच अतिरेक्यांचा सामना करतांना 18 पोलीस अधिकारी, NSG कमांडो, गृहरक्षक दलाचे जवान विरमरण आले.
अतिरेक्यांचा सामना करतांना विरमरण आलेल्या पोलीस अधिकारी, NSG कमांडो, गृहरक्षक दलाचे जवान यांच्या अतुलनीय शौर्याचे स्मरण म्हणून 26 नोव्हेंबर या दिवशी देशभरात शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय येथे शहीदांना श्रध्दांजली अर्पण केली जाते.
26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान संविधान सभेने अंगीकृत केले होते. तेव्हापासून 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारताच्या संविधानाबाबत जनजागृती व्हावी, संविधानाविषयी नागरिकांमध्ये आदर निर्माण व्हावा तसेच देशातील नागरिकांना आपले मुलभुत हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव व्हावी यासाठी देशभरात 26 नोव्हेंबर या दिवशी भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन केले जाते.
26 नोव्हेंबर 2022 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, NSG कमांडो, गृहरक्षक दलाचे जवान यांना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे प्रमुख उपस्थितीत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या वेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, राखीव पोलीस निरीक्षक देवनाथसिंग राजपुत आदी अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.








