तळोदा | प्रतिनिधी
तळोदा शहरालगत असलेल्या लोकवस्तीकडे नेहमीच बिबट्याचे दर्शन होत असल्याने वन विभागाकडून पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील नागरिक, शेतकरी, शेतमजूर यांच्याकडून करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या अनेक दिवसांपासून जुना अक्कलकुवा रोड, बहुरूपा शिवार, रोझवा शिवार, चिनोदा शिवार, दलेलपूर शिवार, रांझणी, प्रतापपूर आदी भागात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून दि.३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात ते आठ वाजेच्या सुमारास तळोदा-शहादा रस्त्यालगत असलेल्या राजू गुरव यांच्या सर्व्हिस स्टेशनच्या घराजवळील नाल्यातून बिबट्या रस्ता ओलांडून फॉरेस्ट विभागाच्या कार्यालयाकडे जात असतांना सायंकाळी फिरायला जाणार्या नागरिकांनी प्रत्यक्ष डोळ्यासमोर बिबट्या पाहिल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. त्यामुळे सायंकाळी फिरायला जाणार्या नागरिकांमध्ये बिबट्याच्या मुक्त संचाराने प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुदैवाने आज पावेतो बिबट्याने माणसांना इजा पोचवली नसली तरी शेतातील रखवालदार, शेतकरी, शेतमजूर, ग्रामस्थ यांच्या शेळ्या, गायीचे वासरू फस्त केल्याचे प्रकार गेल्या काही महिन्यापासून सुरू असून यामुळे शेतकरी, शेतमजूर व नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर ही आता शेतात जाण्यास तसेच सायंकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांमध्ये बिबट्याचा मुक्त संचाराची दहशत पसरली असून याबाबत अनेक वेळा वन विभागाला माहिती दिली आहे. तरी वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्वरित पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी, शेतमजूर व सायंकाळी फिरायला जाणाऱ्या महिला व नागरिकांकडून करण्यात येत आहे.