नवापूर | प्रतिनिधी
नवापूर-बोरझर रस्त्यावर वनविभागाने ट्रॅक्टरमधून अवैधरित्या वाहतूक होत असलेले जळावू लाकूड जप्त केले. तसेच नंदुरबार-करंजी रस्त्यावर मोटरसायकलीवरुन अवैधरित्या वाहतूक होत असलेले ३५ हजार रुपये किमतीचे लाकूडही वनविभागाच्या दुसर्या पथकाने जप्त केले आहे. दोन्ही कारवाईत सुमारे सहा लाखांचा एकुण मुद्देमाल जप्त हस्तगत करण्यात आला आहे.
येथील वनपरिक्षेत्र अधिकारी व वनक्षेत्र स्टाफ नवापूर-बोरझर रस्त्याने गस्त घालत असतांना खळीबर्डी येथील अज्ञात इसम ट्रॅक्टरमध्ये इंजायली जळाऊ लाकडे भरून वाहतूक करताना दिसला. सदर ट्रॅक्टरचा अटकाव केला असता चालक ट्रॅक्टर थांबवून अंधाराचा फायदा घेत पसार झाला. इंजायली जळाऊ मालासह ट्रॅक्टर (क्र.एमएच ३९ एन २००८), ट्रॉली (क्र.एमएच ३९-६८९८) जप्त करून विक्री आगारात जमा केला.
जप्त माल इंजयाली जळाऊ असून घन मीटर ५.००० व लाल रंगाचे ट्रॅक्टर (क्रमांक एमएच ३९ एन २००८), ट्रॉली (क्र.एमएच३९ .६८९८) या मालाची बाजार भावानुसार अंदाजित किंमत ४ ते ४.५ लाख रूपये एवढी आहे.
सदर कार्यवाही वनसंरक्षक दि.वा.पगार, उपवनसंरक्षक कृष्णा भवर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक धनंजय ग. पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल अवसरमल, वनपाल भिवाजी दराडे, ए.एम.शेख, वनरक्षक कल्पेश अहिरे, संतोष गायकवाड, हिरालाल माळी, भूपेश तांबोळी, विकास शिंदे, वाहन चालक दिलीप गुरव यांच्या पथकाने केली.
३५ हजाराचे सागवानी लाकूड जप्त
नवापूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी व वनक्षेत्र स्टाफ खाजगी वाहनाने नवापूर-करंजी खुर्द रस्त्याने पेट्रोलिंग करताना अज्ञात इसम मोटारसायकलीने लाकडांची वाहतूक करताना दिसला. त्याचा पाठलाग केला असता सदर इसम मोटारसायकल व साग चौपाट सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाला.
मोटारसायकलसह साग चौपाट नग ६ जप्त करून खाजगी वाहनाने विक्री आगार नवापूर येथे आणून पावतीने जमा केले. जप्त माल साग चौपाट नग ०६ घन मीटर ०.१३८ व हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची सीडी डीलक्स मोटारसायकल (क्र.एमएच३९ एच ४०२८) या मालाची बाजार भावानुसार अंदाजित किंमत ३० ते ३५ हजार एवढी आहे.
सदर कार्यवाही वनसंरक्षक दि.वा.पगार, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, धनंजय ग. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल अवसरमल, वनपाल भिवाजी दराडे, वनरक्षक संतोष गायकवाड, कमलेश वसावे, प्रशांत सोनार यांच्या पथकाने केली.