नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील डाबचा मालीआंबा येथे मोगराबाई रुमा तडवी या महिलेला बिबट्याने फरफटत नेऊन ठार केल्याची हृदय द्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीयुक्त वातावरण पसरले आहे.या परिसरात असणाऱ्या हिंस्त्रं प्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दि. 19 रोजी रात्री सुमारे नऊ वाजेच्या दरम्यान मोगराबाई रुमा तडवी ( वय 55) या मालीआंबा येथे आपल्या राहत्या घराच्या अंगणात जेवण करीत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवून फरफटत नेले. यावेळी घरात कोणीच नसल्याने असहाय झालेल्या मोगराबाई तडवी यांना बिबट्याने घरापासून सुमारे वीस ते पंचवीस मीटर अंतरावर नेऊन शरीर छिन्नविच्छिन्न केले.
रात्री मयत मोगराबाई रुमा तडवी यांचे पती रुमा तडवी हे घरी आले असता त्यांनी आजूबाजूला मोगराबाई यांना आवाज दिला मात्र घराच्या आजूबाजूला किर्र अंधार असल्या कारणाने व त्यांनी छोट्याशा बॅटरी च्या सह्याने मोगराबाई यांचा शोध घेतला मात्र त्या दिसुन आल्या नाहीत. त्यामुळे रात्री पुन्हा तीन वाजेच्या सुमारास घराच्या आजूबाजूला मोगराबाई यांना आवाज दिला मात्र तरी देखील त्या मिळून आल्या नाहीत म्हणून सकाळी सहा वाजेला उठल्यानंतर घराच्या बाहेर पडल्यानंतर रुमा तडवी यांना घरापासूनच 20 ते 25 मीटर अंतरावरील टेकड्यावर मोगराबाई तडवी यांचा छिन्न विच्छिन्न झालेला मृतदेह व मृतदेहा शेजारी बिबट्या मृतदेहाचे लचके तोडताना दिसला.
त्यामुळे त्यांनी आवाज देऊ आजूबाजूच्या लोकांना घटना सांगितली त्यानंतर सदर घटनेची माहिती डाब चे सरपंच पोलीस प्रशासन व वन विभागाला देण्यात आली त्यानुसार पोलीस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त घटनास्थळाची पाहणी करुन घटनेचा पंचनामा केला तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवर मृतदेहाचे विच्छेदन केले. मृत मोगराबाई तडवी यांच्या घरा जवळच्या परिसरात जंगल आहे त्यामुळे या परिसरात हिंस्त्रं प्राण्यांचा वावर आहे वनविभागाने या हिस्त्र प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी ही परिसरातील नागरिकांनी केली आहे.