नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे 3 लाख रुपये किमतीचे हरविलेले सोने शोधण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार शहरातील मुजावर मोहल्ला परिसरात राहणारे फजल अहमद इनामदार यांचे कुटुंबिय ३ नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता रेल्वेने जळगांव येथे जाण्यासाठी त्यांच्या घरातून रेल्वे स्टेशन येथे निघाले होते. परंतु नंदुरबार रेल्वे स्टेशन येथे पोहोचल्यावर सोन्याचे दागिने असलेली पिशवी ही घरीच राहिली त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले. म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी शफजल इनामदार यांना फोनद्वारे कळवून घरी राहिलेले सोन्याचे दागिने रेल्वे स्टेशन येथे घेवून येणेबाबत सांगितले.
फजल इनामदार हे अत्यंत घाई घाईने सोन्याचे दागिने असलेली पिशवी घेवून मोटार सायकलने इलाही चौक, घोडापीर मोहल्ला, हाट दरवाज, नेहरू पुतळा मार्गे रेल्वे स्टेशन येथे जाण्यासाठी निघाले. नंदुरबार रेल्वे स्टेशन येथे पोहोचताच त्यांच्या लक्षात आले की, दागिन्यांची असलेली पिशवी खालच्या बाजूने फाटून सोन्याचे दागिने वाटेत कुठे तरी खाली पडले.
म्हणून फजल इनामदार यांनी पुन्हा रेल्वे स्टेशनपासून त्यांच्या घरापर्यंत रस्त्यात दागिन्यांचा शोध घेतला, परंतु कुठेही त्यांना सोन्याचे दागिने मिळून आले नाही. म्हणून त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे सोन्याचे दागिने हरविलेबाबत तक्रार नोंदविली.
आजच्या धावपळीच्या युगात हरविलेली वस्तु सापडल्यानंतर परत करुन माणुसकी जपणारे अत्यंत कमी पाहावयास मिळतात. फजल इनामदार यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदविल्यानंतर देखील त्यांचे दागिने त्यांना मिळाले नाहीत. म्हणून फजल इनामदार यांनी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांची भेट १० नोव्हेंबर रोजी घेत श्री. इनामदार यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला व सदर घटना ऐकल्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना तक्रारदार इसमाची सखोल विचारपूस करुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत निर्देश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी फजल इनामदार यांची तक्रार ऐकुन घेतल्यानंतर सर्व घटनाक्रम लक्षात घेतला व तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास इलाही चौक, घोडापीर मोहल्ला, हाट दरवाज, नेहरू पुतळा मार्गे रेल्वे स्टेशन परिसरात असलेले सर्व सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी करणेबाबत सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इलाही चौक, घोडापीर मोहल्ला, हाट दरवाज, नेहरू पुतळा मार्गे रेल्वे स्टेशन पावेतो सी. सी. टी. व्ही. फुटेजची पहाणी केल्यानंतर, नेहरु पुतळ्याच्या पुढे फजल इनामदार यांची मोटार सायकल गेल्यानंतर एक कचरा उचलणारा इसम काही तरी उचलतांना दिसून आला.
म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या कचरा उचलणाऱ्या इसमाची माहिती काढून त्याचा शोध घेतला. त्या इसमाचा शोध घेतल्यानंतर तो इसम नंदुरबार शहरातील शबरीहट्टी परिसरातील शंकर शिवराम भिल हा असल्याचे समजले. त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर शंकर भिल यांनी नंदुरबार शहरातील नेहरु पुतळ्याच्या पुढे सोने सारखे दिसणारे काही दागिने सापडले होते, ते बनावट किंवा नकली असावेत म्हणून शंकर भिल यांनी त्यांच्या मुलीसाठी घरी घेवून आले त्याचा कसोशीने शोध स्थानिक गुन्हे शाखाने घेतला असता त्यात एक सोन्याचा हार, एक सोन्याची चैन, 2 कानातले टोंगल, 2 अंगठ्या असे 60 ग्रॅम वजनाचे सुमारे 3 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी फजल इनामदार यांना पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे त्यांच्या दालनात बोलावून फजल इनामदार यांच्या हातात त्यांचे हरवलेले 3 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ठेवताच फजल इनामदार यांच्या डोळ्यातून आनंदाश्रु निघाले. श्री. फजल इनामदार यांना त्यांचे हरवलेले सोन्याचे दागिने शोधून परत केल्यामुळे त्यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले.
सदरची कामगिरी ही नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस हवालदार पोलीस नाईक राकेश मोरे, पोलीस शिपाई अभय राजपुत यांच्या पथकाने केली आहे.








