नंदुरबार l
शहादा येथील समता नगरातील दोघांनी व शहादा तालुक्यातील सटीपाणी येथील एकाने कोयते व मजूर पुरविण्याचे सांगत नागाव (ता.वाळवा) येथील एकाची ४ लाख २० हजारात तर कुंबोज (ता.हातकंगले) येथील एकाची ४ लाखात फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, वाळवा तालुक्यातील नागाव येथील सुरेश विठ्ठल शिसावे यांनी कृष्णा हारु सोनवणे (रा.समता नगर, शहादा) यांना ऊस तोडणीसाठी २२ कोयते व ४४ मजूर पुरविण्यासाठी ३ लाख रुपये दिले व मजूरांना वाटले होते. तसेच कृष्णा सोनवणे याचा मित्र रविंद्र भामरे याच्या फोन-पे नंबरवर १ लाख २० हजार रुपये ट्रान्सफर केले होते. मात्र आजपावेतो सुरेश शिसावे यांना कृष्णा सोनवणे व रविंद्र भामरे यांनी ऊस तोडणीसाठी कोयते व मजूरांचा पुरवठा न करता ४ लाख २० हजार रुपये घेवून फसवणूक केली. तसेच सुरेश शिसावे यांनी रक्कम परत मागितली असता उडवाउडवीची उत्तरे दिली.
याबाबत सुरेश शिसावे यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात कृष्णा सोनवणे व रविंद्र भामरे यांच्याविरोधात भादंवि कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हातकंगले तालुक्यातील कुंबोज येथील कामदेव शामराव पुजारी यांनी मालसिंग रामदास तडवी (रा.सटीपाणी ता.शहादा) याला १० कोयते व २० मजूर पुरविण्यासाठी शिरपूर येथील बॅँक ऑफ इंडिया शाखेतून मालसिंग तडवी याच्या खात्यावर आरटीजीएसने ५० हजार रुपये टाकले. तसेच ३ लाख ५० हजार रुपये दिले होते.
मात्र आजपावेतो कामदेव पुजारी यांना ऊस तोडणीसाठी कोयते व मजूरांचा पुरवठा न करता ४ लाख रुपये घेवून फसवणूक केली. रक्कम परत करण्यासाठी कामदेव पुजारी यांनी मालसिंग तडवी यांना संपर्क केला असता त्याचा मोबाईल बंद होता. याबाबत कामदेव पुजारी यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात मालसिंग तडवी याच्याविरोधात भादंवि कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहकॉ.दीपक परदेशी करीत आहेत.