नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील निंबोणी गावाजवळ आज दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास कारचे टायर निघाल्याने कारचा अपघात झाला आहे. कार नदीत कोसळली असती तर मोठी दुर्घटना झाली असती सुदैवाने कार कठड्यामुळे वाचली.या अपघातात पाच जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील अकोलाहून गुजरात राज्यातील भरूच येथे पागृथ परिवार दिवाळी सणाच्या भाऊबीज सण साजरा करण्यासाठी जात असताना नवापूर तालुक्यातील निंबोणी गावाजवळील पुलाजवळ (क्र.एम.एच.३०, ए. झेड.१६३१) कारचा पुढच्या टायर निघाल्याने कार अनियंत्रित होऊन पुलाच्या कठड्याला जाऊन आदळल्याने अपघात झाला.
या अपघातात आरव अनुराग पागृथ (वय ११ ) हा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याचसोबत आई- ज्योती अनुराग पागृथ (वय ३० वडील) अनुराग पुरुषोत्तम पागृथ (वय ३२) आजोबा पुरुषोत्तम विठ्ठलराव पागृथ (वय ६६) आजी दीपा पुरुषोत्तम पागृथ (६२) हे पाच जण जखमी झाले आहेत.अपघातात कार मधील एअर बॅग वेळेवर निघाल्याने सर्वांचे प्राण वाचले आहे.
अपघात होताच स्थानिक नागरिकांनी मदत कार्य करत 108 रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना खांडबारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे.
खांडबारा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे पाठवण्यात आला आहे.घटनास्थळी बघणाऱ्यांनी एकच मोठी गर्दी केली होती.
या घटनेबद्दल पोलिसांना कुठलाही थांगपत्ता नव्हता अपघातांच्या बाबतीत पोलीसांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. अपघात स्थळी संपूर्ण गाव गोळा होऊन जाते परंतु पोलिसांना त्याचा थांगपत्ता लागत नाही. याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्थानिकांनी कुठलाही विलंब न करता अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचवल्याने त्यांचे प्राण वाचले.