नंदुरबार l प्रतिनिधी
शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी बाबत महसूल यंत्रणेकडून मार्गदर्शन करण्यात येत असून नंदुरबार तालुक्यातील कार्ली व मांजरे येथे तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या कार्यक्रमाची माहिती दिली.
श्री.थोरात यांनी दोन्ही गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, ई-पीक पाहणी प्रणालीद्वारे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन पीक पाहणीची जलद वस्तुनिष्ट आणि पारदर्शक पद्धतीने माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीकपेरा नोंदीसाठी होणाऱ्या श्रमाची व वेळेची बचत होईल. या ॲपच्या माध्यमातून प्रत्येक खातेदाराची प्रमाणित माहिती उपलब्ध होणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांने आपल्या मोबाईलमध्ये ‘ई-पीक’ पाहणी ॲप डाऊनलोड करुन आपल्या शेतातील पिकाची अचून नोंद करावी. शेतकऱ्यांना ॲपचा वापर करण्यात अडचण येत असल्यास तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
नंदुरबार तालुक्यात 155 गावातील शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीसाठी ॲपचा उपयोग सुरू केला असून 6 हजार 672 खातेदारांनी आपला पिक पेरादेखील व्यवस्थितरित्या पोर्टलवर अपलोड केला आहे. उर्वरीत 340 खातेदारदेखील लवकरच पीक पाहणी अहवाल अद्यावत करतील.