नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्हा परिषदेत नाटयमयरित्या घडामोडी घडून भाजपाच्या डॉ.सुप्रिया विजयकुमार गावित या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. तर कॉंग्रेसचे सुहास वेच्या नाईक हे भाजपा व त्यांच्या समर्थकांच्या मतांवर विजयी झाले आहेत. त्यामुळे गेल्या अडीच वर्षापुर्वी स्थापन झालेली महाविकास आघाडीची सत्ता संपुष्टात आली असून जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकला आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आज दि.१७ ऑक्टोबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यात डॉ.सुप्रिया गावित यांना ३१ तर ॲड.सीमा वळवी यांना २५ मते मिळाली. त्यामुळे डॉ.सुप्रिया गावित यांना विजयी घोषित करण्यात आले. तसेच उपाध्यक्षपदासाठी सुहास नाईक यांना ३१ तर ॲड.राम रघुवंशी यांना २५ मते मिळाल्याने त्यामुळे सुहास नाईक यांना विजयी घोषीत करण्यात आले. या निवडणुकी भाजपाचे २० मते काँग्रेसचे नवापूर तालुक्यातील सदस्य प्रकाश कोकणी शहादा तालुक्यातील हेमलता शितोळे, अक्कलकुवा तालुक्यातील सुराय बी मकरांनी, तळोदा तालुक्यातील सुहास नाईक, अक्कलकुवा तालुक्यातील नीलूबाई नटवर पाडवी,
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे गणेश पराडके, शंकर आमश्या पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहादा तालुक्यातील मोहन शेवाळे तर नवापूर तालुक्यातील सुनील गावित, धर्मसिंग वसावे, सुशीला कोकणी यांनी भाजपाला मतदान केल्याने जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आली.








