नंदुरबार l प्रतिनिधी
प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात ग्रामीण भागात अनेकदा वैद्यकीय अधिकारी, कर्मचारीच नसल्याने अनेकदा रुग्णांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबतच्या तक्रारी नागरिकांसह लोकप्रतिनिधींकडून देखील सातत्याने करण्यात येतात.
यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्य मार्गदर्शनाखाली जि.प.आरोग्य विभागाच्या आठ पथकांनी ३४ केंद्रांना रात्री अचानक भेटी दिल्या असता त्यात तब्बल ६६ कर्मचारी व १२ वैद्यकीय अधिकारी गैरहजर आढळून आले. यामुळे अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आता कारवाईची टांगती तलवार दिसून येत आहे. तर ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी यापुढे रात्रीच्यावेळी अशाच अचानक धाडींचे नियोजन असल्याचे जि.प. प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ग्रामीण भागात आरोग्य केंद्र, उपकेंद्र असले तरी बऱ्याचदा वैद्यकीय अधिकारी, कर्मचारीच उपस्थित राहत नसल्याने आरोग्य सेवेचा बोजवारा उडतो. नागरिकांकडून याबाबत तक्रारी देखील करण्यात येतात. मात्र तरीही काही अधिकारी, कर्मचारी याकडे फारसे गांभीर्याने घेत नाहीत. याबाबत लोकप्रतिनिधींकडून देखील सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. वेळेवर आरोग्य सेवा न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी व वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यासाठी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा आरोग्याधिकारी गोविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या आठ पथकांनी नंदुरबार जिल्ह्यातील ३४ प्राथमिक आरोग्य केेंद्रांवर अचानक धाडी टाकल्या.
यात ६६ कर्मचारी व १२ वैद्यकीय अधिकारी अनाधिकृतपणे गैरहजर असल्याचे आढळून आले. तर ४३ कर्मचारी व ९ वैद्यकीय अधिकारी रजेवर होते. तसेच २४३ कर्मचारी व ४८ वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रांवर उपस्थित असल्याचे आढळून आले.
रात्रीच्यावेळी बऱ्याचदा आरोग्य केंद्र, उपकेंद्र कुलूप बंद असतात. यामुळे तपासणीसाठीच सदरची मोहीम राबविण्यात आली. आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या या मोहीमेमुळे मात्र कामचूकार कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. असे असले तरी जनमानसातून मात्र आरोग्य विभागाच्या या मोहीमेचे कौतूक केले जात आहे.
ग्रामीण भागात रात्रीच्यावेळी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानुसार दि.७ व ८ रोजी जिल्ह्यातील ३४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना आठ पथकांच्या माध्यमातून अचानक भेटी दिल्या. यात अधिकारी, कर्मचारी गैरहजर आढळून आले. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. यापुढेही अशा मोहीम सुरु राहणार आहेत. शाळेवर गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांसाठी देखील अशीच मोहीम राबविण्याचे नियोजन आहे.असे
मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले.








