शहादा l प्रतिनिधी
श्री.पी.के. आण्णा पाटील फाउंडेशन आणि विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळाच्या वतीने आयोजित हृदयरोग तपासणी शिबिरात 325 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील 110 रुग्णांची स्ट्रेस टेस्ट होणार असून 125 रुग्णांची ऍन्जिओग्राफी करण्यात येणार आहे.

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुख्य सभागृहात अण्णासाहेब पी.के. पाटील यांच्या जयंतीनिमित्त दि. 8 रोजी मोफत भव्य हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार संसदरत्न डॉ. हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील होते. यावेळी शहादा-तळोदा मतदार संघाचे आ. राजेश पाडवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमास श्रीमती कमलताई पाटील, जि. प. सदस्य जयश्री पाटील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक उपस्थित होते. धुळे येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. मनोज पटेल, हृदयरोग तज्ञ तथा बायपास सर्जन डॉ. यतीन वाघ, डॉ. राजेंद्र महाजन, डॉ. कल्पेश पटेल, डॉ.दिपाली पटेल यांनी रुग्णांची तपासणी केली.
या शिबिरात सव्वा तीनशे रुग्णांची तपासणी करण्यात आली. 200 रुग्णांचे इसीजी करण्यात आले. त्यापैकी 110 रुग्णांची स्ट्रेस टेस्ट तर 125 रुग्णांची एन्जिओग्राफी करण्यात येणार आहे. यातील 60 रुग्णांची टू डी इको (हृदयाची सोनोग्राफी) करण्यात आली पैकी 25 रुग्णांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य शिबिराचे समन्वयक डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी दिली.
शिबिरासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी स्वयंसेवक म्हणून सहकार्य केले. आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री.पी.के अण्णा पाटील फाऊंडेशन चे सचिव मकरंद पाटील व Vsggm चे संचालक डॉ.प्रफुल्ल पाटील व Vsggm चे सदस्य तथा विविध विद्या शाखांचे प्राचार्य , प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली








