शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ व श्री.पी.के. अण्णा पाटील फाउंडेशन, शहादा जि.नंदुरबार यांच्या वतीने विचार मंथन, किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभ रविवार दि. 9 ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणात रविवार दि 9 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता आयोजित करण्यात आलेल्या विचार मंथन, किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील हे राहतील.यावेळी आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री नंदुरबार ना. डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
यावर्षी व्यक्ती स्तरावर पुणे येथील प्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर यांना तर संस्था स्तरावरील पुरस्कार जळगाव येथील केशव स्मृती प्रतिष्ठान यांना देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये,स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र अशा स्वरूपाचे आहे.या कार्यक्रमास नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खा.डॉ.हिना गावित, शहादा तळोदा मतदारसंघाचे आ. राजेश पाडवी,
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या सचिव श्रीमती कमलताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के.पाटील यांचा व्यक्तिवेध घेणारा गौरव ग्रंथ ‘आधारवड’ याचेही प्रकाशन करण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन श्री. पी.के. अण्णा पाटील फाउंडेशनचे सचिव प्रा. मकरंद पाटील व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, आता पावेतो पुरुषोत्तम पुरस्काराचे व्यक्ती स्तरावरील मानकरींमध्ये प्रा.राम ताकवले, डॉ. विजय भटकर, डॉ. वसंत गोवारीकर, डॉ. सुखदेव थोरात, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ.जयंत नारळीकर, डॉ. दीपक टिळक, डॉ. बी.के. गोयल, डॉ.नरेंद्र जाधव, डॉ. सदानंद मोरे,स्वर्गीय सिंधुताई सपकाळ, डॉ. शरद काळे, पोपटराव पवार, कवी ना.धों महानोर, डॉ. सतीश मराठे, पानिपतकार विश्वास पाटील, पद्मश्री रहीबाई पोपेरे यांच्या तर संस्था स्तरावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, श्रीक्षेत्र चैतन्य अध्यात्मिक केंद्र, महाराष्ट्र साहित्य परिषद,महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे,उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक, भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान संस्था, साधना ट्रस्ट पुणे,हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप कोल्हापूर, सेवाग्राम आश्रम वर्धा,डॉक्टर लाजपतराय मेहरा निरोथेरपी आश्रम, प्रभा हिरा प्रतिष्ठान पंढरपूर, इतिहासाचार्य वि.का. राजवाडे इतिहास संशोधन मंडळ धुळे, मराठी विज्ञान परिषद मुंबई, श्रद्धा रिहबिलिटेशन फाउंडेशन, नाम फाउंडेशन पुणे, राष्ट्रीय विद्यालय खामगाव यांचा समावेश आहे.
हृदयरोग तपासणी व रक्तदान शिबीर
व्हिएसजीजीएम व सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते हृदयरोग आरोग्य तपासणी शिबिराचे तर आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे.अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या कार्यक्रमा मोफत हृदयरोग आरोग्य तपासणी व करण्यात येणार आहे.शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.








