नंदूरबार l प्रतिनिधी
शहराच्या वळण रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्यांमुळे होणारे अपघात व नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, आठ दिवसांत खड्डे भरून रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर रास्ता रोको करण्याचा इशारा नंदुरबारचे उपनगराध्यक्ष कुणाल वसावे यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला दिलेल्या निवेदनात दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, शेवाळी-नेत्रंग व विसरवाडी – खेतिया हे दोन महामार्ग नंदुरबारच्या वळण रस्त्यावरून गेले आहेत. परंतु या रस्त्याची अवस्था सध्या अतिशय दयनीय झाली आहे. नवापूर चौफुलीपासून ते सी. बी. चौफुलीपर्यंत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. एकाच वेळी दोन वाहने पास करणे म्हणजे मोठे जिकरीचे ठरते. त्यातच सध्या अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे अपघात देखील वाढले आहेत.
सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. नंदुरबारकरांचे दैवत असलेल्या वाघेश्वरी देवीसाठी डोंगरावर चढण्यासाठी जेथून रस्ता आहे तेथेच मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे भाविकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. वळण रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणावर रहिवासी वस्ती आहेत. त्यामुळे नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक देखील मोठी असते. त्यामुळे या रस्त्याची निकड अधिक आहे.
असे असतांना या रस्त्याच्या दुरुस्तीकडे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष केले आहे. येत्या आठ दिवसांत रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर रास्ता रोको करण्याचा इशारा उपनगराध्यक्ष कुणाल वसावे यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे.








