नंदुरबार l प्रतिनिधी
शाश्वत स्वच्छतेसाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या सवयीत बदल करून कमीत कमी कचरा निर्माण करावा .यामुळे कार्यालय व स्वतःचा परिसर स्वच्छ राहील .तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकाने समाजात वावरत असताना स्वच्छतादूत म्हणून काम करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.
देशात 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 यादरम्यान स्वच्छता ही सेवा हे अभियान सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, कर्मचाऱ्यांनी आपले कार्यालय व परिसर कायमस्वरूपी स्वच्छ व प्रसन्न कसा राहील यासाठी स्वच्छतेच्या सवयी अंगीकारून स्वतःच्या वर्तनात कायमस्वरूपी बदल घडवून आणावा. तसेच आपल्या वर्तणुकीने इतरांपुढे आदर्श निर्माण करावा असे आवाहन केले

याप्रसंगी प्रकल्प संचालक राजेंद्र पाटील यांनीही कर्मचाऱ्यांना कार्यालयीन स्वच्छते विषयी मार्गदर्शन केले .यावेळी कार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता (ग्रापापु),संजय बाविस्कर ,कार्यकारी अभियंता नीलिमा मंडपे, शिक्षण अधिकारी चौधरी आदीसह विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी कर्मचाऱ्यांसह प्रशासकीय इमारतीच्या परिसरात श्रमदान करून स्वच्छता केली .यानंतर कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कार्यालयात स्वच्छता करून संचिकांचे वर्गीकरण केले.