तळोदा । प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील चिनोदा शेत शिवारातील केळीचे झाडे कापून नासधूस करून नुकसान केल्याची घटना सोमवार दि.२३ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेमुळे संबंधित शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अज्ञात माथेफिरूचा तपास करुन बंदोबस्त करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांने केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शेतकरी उमाकांत माधवराव पाटील यांनी आपल्या चिनोदा शिवारातील सर्व्हे नंबर ६४/१/१ या क्षेत्रात साडेतीन एकर क्षेत्रात केळीची लागवड केली आहे. सोमवार रोजी शेतकरी उमाकांत पाटील आपल्या केळीच्या शेतात गेले असता त्यांना शेतातील केळीची ३० ते ३५ झाडे कापून नुकसान करून नासधूस झाल्याचे दिसून आले. अशा घटनेमुळे परिसरातील शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेती पिकांचे नुकसान करणार्या अज्ञात माथेफिरुचा बंदोबस्त करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांने केली आहे.
यावर्षी पावसाळा सुध्दा समाधानकारक नसल्यामुळे पिके सुध्दा जेमतेम स्थितीत असल्याने जी पिके आहेत ती जगविण्यासाठी शेतकरी रात्रंदिवस मेहनत घेतांना दिसून येत आहे. चिनोदा परिसरात केळी या पिकाची बर्यापैकी लागवड करण्यात आली आहे. शेतकरी घाम गाळून केळी पिकाचे संगोपन करत आहे. मात्र समाधानकारक पाऊस नसल्याने त्यातच अशा अज्ञात माथेफिरुकडून केळीचे झाडे कापून नुकसान केल्याने अशा संकटामुळे शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीस आला आहे. केळी पिकावर सुरूवातीपासूनच शेतकऱ्यानी अतोनात खर्च केला आहे.
केळी लागवडीसाठी लागणारे चांगल्या दर्जाचे केळीचे खोड तसेच त्यात ठिबक सिंचन करणे, विविध महागडी खते, औषधी व फवारणी यांचा मोठ्या प्रमाणावर खर्च येत असतो. मात्र अशा अज्ञात माथेफिरुंकडून अशाप्रकारे शेती पिकांची नासधूस करण्यात येत असल्यामुळे शेतकर्यांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी अशा अज्ञात माथेफिरूचा शोध घेऊन बंदोबस्त करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांकडून करण्यात येत आहे.