नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील खडक्या येथे २७ वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटूंबियांनी केला आहे.यात त्यांच्याकडे मयत महिलेशी झालेले शेवटच्या संभाषणाची ऑडिओ क्लीप असल्याचा दावा करण्यात येत आहे.
असे असतांना संबंधित पोलीस निरीक्षकांनी हयगय केली असून अशा पोलीस अधिकाऱ्यांची बदली नको तर निलंबन करण्यात यावे, अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.तसेच सुरूवातीला शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
धडगाव तालुक्यातील खडक्या येथे भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मयत पीडीत महिलेच्या कुटूंबियांची भेट घेवून परिस्थिती जाणून घेतली तसेच त्यांचे सांत्वन केले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी श्रीमती वाघ म्हणाल्या, दि.२ ऑगस्ट रोजी पीडीत मयत मुलीचे वडील पोलीसात गेल्यावर त्यांनी मुलीवर अत्याचार झाले असून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप केला.तसेच पीडीतेचे तिच्या नातेवाईकांशी झालेले अखेरचे संभाषण असणारा मोबाईल व त्यात संभाषणाची ऑडीओ क्लिप असतांना कलम ३०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर संशयित रणजित ठाकरे यास अटक करण्यात आली.
खरे तर पोलीसांनी पुरावा ऑडिओ क्लिपनुसार गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते.मात्र त्यांनी यात हयगय केल्याने पीडीत मुलीच्या कुटूंबियांनी न्यायासाठी मृतदेह जाळला नाही.यानंतर दि.७ सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षकांशी चर्चा झाल्यानंतर पुन्हा शवविच्छेदनाची मागणी करण्यात आली.न्यायालयातूनपरवानगी मिळाल्यानंतर मुंबई येथील जे.जे.रुग्णालयात पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले.यामुळे आता सदरच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यावर सदर प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचे वाघ म्हणाल्या.त्या पुढे म्हणाल्या की,या प्रकरणात संबंधित पोलीस निरीक्षक,उपनिरीक्षक व चार पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
मात्र कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निलंबन व्हावे, वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही कर्तव्यात कसूर केली आहे किंवा नाही याच्या पडताळणीसाठी मुंबई येथील शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर तज्ञ डॉक्टरांची विशेष समिती नेमण्यात यावी, तसेच संशयितांवर कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी केली आहे.तसेच या प्रकरणावर मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांचे विशेष लक्ष असल्याचेही श्रीमती वाघ म्हणाल्या.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी उपस्थित होते.








