नंदुरबार | प्रतिनिधी
जबरीने मोबाईल हिसकावणारी आंतरराज्यीय टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करत १ लाख ५६ हजार ५०० रुपये किमतीच्या मुद्देमालासह हस्तगत करीत ५ गुन्हे उघड केले आहे.
मागील काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहर , उपनगर , नवापूर पोलीस ठाणे हद्दीत मोटार सायकलवरील इसम नागरिकांच्या हातातील मोबाईल जबरीने हिसकावून घेवून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती . नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत या पध्द्तीचे गुन्हे दाखल असुन ते गुन्हे अद्यापही उघडकीस आलेले नव्हते . त्याअनुषंगाने गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करून गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकार्यांना याबाबत निर्देश दिले .
लंकेश हरिदास सांगोडकर रा . माणिक नगर , नंदुरबार हे नंदुरबार शहरातील अंधारे स्टॉपजवळ फोनवर बोलत घरी जात होते . त्यावेळेसे त्यांचे मागून अचानक एका काळया रंगाचे मो . सा . वर दोन अनोळखी इसम आले . मोटार सायकलच्या मागील सीटवर बसलेल्या इसमाने फिर्यादीच्या हातातील १३ हजाराचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेवून गेले , म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता .
पोलीस अधीक्षक यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , नंदुरबार शहरातील सी . बी . पेट्रोल पंप परिसरात एका काळ्या रंगाच्या मोटार सायकलवर दोन अनोळखी इसम बिल पावती नसलेले महागडे मोबाईल फोन कमी किमतीत विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत आहेत , अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना कळवून बातमीची खात्री करुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले . स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन पथकास तात्काळ रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार शहरातील सी.बी. पेट्रोल पंप परिसरात सापळा रचला .
तेथे एका चहाच्या टपरीजवळ काळ्या रंगाच्या मोटार सायकलवर दोन अनोळखी इसम संशयास्पद स्थितित बसलेले दिसून आले. पथकाने सदर ठिकाणी काळ्या रंगाच्या मोटार सायकलवर बसलेल्या राहुल ऊर्फ सनी बाबा जितेंद्र साळवे, समीर विजय वसावे दोन्ही रा . भिल जांबोली ता . निझर जि . तापी गुजरात यांना अटक केलीे . पंचासमक्ष दोन्ही इसमांची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात ८ महागडे मोबाईल मिळुन आले . ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयीत इसमांना मोबाईल व मोबाईलच्या बिलाबाबत विचारपूस केली असता ते कोणतेही समाधानकारक उत्तर देत नव्हते , म्हणून दोन्ही संशयीतांना स्थानिक गुन्हे शाखा आणून सखोल विचारपूस केली असता त्यांनी मागील काही दिवसांमध्ये समीर वसावे याच्या काळ्या रंगाची मोटार सायकलने नंदुरबार शहर , उपनगर व नवापूर शहरात येवून मोबाईलवर बोलत असलेल्या नागरिकांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेवून गेल्याचे सांगितल्याने
त्यांच्या ताब्यातून ८६ हजार ५०० रुपये किमतीचे ८ महागडे मोबाईल व ७० हजार रुपये किमतीची होंडा सी.बी. शाईन मोटार सायकल असा एकुण १ लाख ५६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करण्यात आला आहे . ताब्यात घेण्यात आलेले राहुल ऊर्फ सनी बाबा जितेंद्र साळवे याचा गुन्हे अभिलेख पडताळून पाहिला असता त्याचेवर गुजरात राज्यातील सुरत येथे अशाच प्रकारचे जबरी चोरीचे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत .
तसेच नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचा गुन्हे अभिलेख पडताळून पाहिले असता नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३९२,३४, भा.द.वि. कलम ३९२,३४ ( ३ ), उपनगर पोलीस ठरण्यात भा.द.वि. कलम ३९२,३४ ( ४ ) नवापूर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३९२,३४ , नवापूर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३९२,३४ याप्रमाणे ५ गुन्हे उघडकीस आलेले आहेत . तसेच आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे . ताब्यात घेण्यात आलेला राहुल ऊर्फ सनी बाबा जितेंद्र साळवे, समीर विजय वसावे व हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे .
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारीसचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील , पोलीस हवालदार मुकेश तावडे , पोलीस नाईक मनोज नाईक , जितेंद्र ठाकुर , मोहन ढमढेरे , जितेंद्र तोरवणे , पोलीस कॉन्सटेबल अभय राजपुत यांच्या पथकाने केली आहे .








