नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील धोकेदायक चौफुली व वळणांवर रिफ्लेक्टर रहित गतिरोधक बसविणे, मोकाट बुरे ढोरे यांच्या बंदोबस्तासह डेंग्यूची साथ नियंत्रित करण्यासाठी औषध फवारणी करण्याबाबत आरपीआय आठवले पक्षाच्या युवक आघाडी कडून मागणीचे निवेदन नंदूरबार मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, नंदूरबार शहरातील जगतापवाडी, करण चौफुली, जेततन बुद्ध विहाराकडील चौफुली, सी.बी. पेट्रोल पंप वळण रस्ता, या ठिकाणी अत्यंत धोक्याची वळणे आहेत. या महामार्गावरील रस्ते अत्यंत खड्डेमय व दयनीय परिस्थितीत आहे. या चौफुलींवर अवजड वाहनधारक अत्यंत बेदरकारपणे वाहने चालवत असतात.
वरील सर्व धोकेदायक वळण रस्ते व चौफुल्या दाट लोकवस्ती असलेल्या जागी असल्यामुळे या परिसरातील नागरिक अत्यंत दहशतीत त्रस्त आहेत. तरी या धोकेदायक वळणांवर रिफ्लेक्टर रहित गतिरोधक तात्काळ बसवण्यात यावेत. वरील विषयातील महामार्गावरील खड्ड्यांचे डागडुजी तात्काळ संबंधित विभागाकडून करण्यात यावी जेणेकरून मोठा अपघात घडून जीवित हानी होण्याची घटना टाळता येईल. महोदय संपूर्ण देश जनावरांमधील लंम्पी आजाराने भयभीत असतांना आपल्या शहरातील सार्वजनिक स्थळी व प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरे व गुरेढोरे यांची मोठ्या प्रमाणात गंभीर समस्या आहे.
तरी मोकाट गुरे ढोरे हे संक्रमित होऊ नये व वाहतूक सुरळीत होण्यासाठी जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवून त्यांना लंम्पी आजाराचे संक्रमण होणार नाही यासाठी खबरदारी घेत शासकीय उपाययोजना कराव्यात. आपल्या शहरात पावसाच्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत आहे शहरात विविध आजारांची साथ आहे. डेंग्यू सदृश रुग्ण देखील आढळत आहेत तरी डेंग्यूचे साथ अधिक प्रमाणात पसरू नये यासाठी आपल्या नगरपालिकेच्या प्रशासनामार्फत शहरात औषध फवारणीसह योग्य ती प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी
अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष युवक आघाडीच्या वतीने नंदुरबार आरपीआय आठवले युवक जिल्हाप्रमुख सुभाष पानपाटील, शहराध्यक्ष सुलतान पिंजारी, अजित कुलकर्णी, मितुल श्रॉफ, गौतम पानपाटील, हितेश गायंके, आदींच्या वतीने करण्यात आली.








