नंदुरबार l
मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे जळगाव येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करुन निलंबित करण्यात यावे. दि.५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत कारवाई न झाल्यास नंदुरबार शहरातील अंधारे चौकात सहपरिवार आमरण उपोषणास बसणार, असा ईशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक नितीन जगताप यांनी दिला आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगांव पोलीस दलातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल अतिशय घाणेरड्या, आक्षेपार्ह वक्तव्य केलेले असून त्याबाबतची दि.१३/०९/२०२२ रोजीची ऑडीओ क्लिप व्हायरल झालेली असून एका पोलीस निरीक्षक अशा महत्त्वाच्या व प्रतिष्ठेच्या पदावर नियुक्त असताना एखाद्या समाजाबद्दल बेताल वक्तव्य करुन संपूर्ण समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत. तरी एखाद्या जबाबदार अधिकार्याच्या मनात जर एखाद्या समाजाबद्दल इतका द्वेष राहत असेल तर अशा अधिकार्याकडून सामाजिक न्यायाची, सुव्यवस्थेची काय अपेक्षा करता येईल.
एवढ्या मोठ्या पदावरील जबाबदार व्यक्तीने सामाजिक कायदा व सुव्यवस्था राखणे हे त्यांचे कर्तव्य असताना अशा बेजबाबदार व्यक्तीकडून समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करुन कायद्याची स्वतः पायमल्लीच केलेली असून आपल्या पदाचा दुरुपयोग केलेला आहे. सदर पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले हे पोलीस म्हणून तिथे कुठे कार्यरत असतील तिथे मराठा समाजाबद्दल त्यांच्या आकस, द्वेष कायम राहील. म्हणून अशा पोलीस अधिकार्याची फक्त बदली करुन काहीही होणार नाही.
तरी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना त्वरीत कायमस्वरुपी बडतर्फ/निलंबित करण्यात येवून त्यांच्याविरुद्ध सामाजिक भावना दुखविल्याबाबत व महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यातील नियम, अटी व शर्तींचा भंग केला म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा सकल मराठा समाजातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. निवेदनावर नितीन जगताप, हरिष हराळे, शामबापू मराठे, किरण गवळी, प्रविण मराठे, विशाल मराठे, प्रल्हाद मराठे, संभाजी पाटील, महेंद्र मराठे, यशराज मराठे, किरण मराठे, गिरधर पवार, भगवान मराठे, प्रकाश हराळे, हेमंत कदम, जयदेव पाटील, प्रफुल खैरनार, कल्पेश राजपूत, राजा मराठे, प्रकाश मराठे, विनायक मराठे, जितेंद्र मराठे, सुनिल चव्हाण, किशोर मराठे आदींच्या सह्या आहेत.








