नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत अंगणवाडी केंद्रात ६ महिन्यातील ३ वर्षातील बालकांसाठी टीएचआर घरपोच आहाराचे वाटप करण्यात येते. मात्र धडगांव तालुक्यातील रोषणमाळ खुर्दे येथे सदर पोषण आहार रस्त्याच्याकडेला फेकलेला आढळून आल्याने स्थायी समितीच्या सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करत एका वर्षात कुपोषणमुक्तीसाठी ३८ कोटी ८१ लाख २३ हजार ९११ रूपये खर्च करूनही धडगांव तालुक्यात कुपोषित बालकांचे प्रमाण वाढले असून याप्रकरणी तेथील सीडीपीओ व सुपरवायझर यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात जि.प.उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, जि.प.कृषी सभापती गणेश पराडके, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान स्थायी समितीच्या झालेल्या सभेत जिल्ह्यात आचारसंहिता असल्याने कुठलाही धोरणात्मक निर्णय घेण्यात आल नाही.
दरम्यान यावेळी जि.प.सदस्य सी.के.पाडवी यांनी धडगांव तालुक्यातील रोषणमाळ खुर्दे येथे अंगणवाडीत ६ महिने ते ३ वर्षाच्या बालकांना देण्यात येणारा पोषण आहार रस्त्यावर पडलेला असल्याचे फोटो सभागृहात दाखविले. यावेळी सभापती रतन पाडवी यांनी संतप्त प्रतिक्रीया देत लहान बालके याप्रकारचे पोषण आहार खातील का, असा संतप्त सवाल करीत धडगांव तालुक्यात पुर्णतःह पोषण आहार पोहाचत नसल्याचा आरोप केला त्यासोबत चार महिन्यांपासून सदर पोषण आहार लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला नसून शासन यावर करोडो रूपये खर्च करते. मात्र अंगणवाडयाच भरत नसल्याचे त्यांनी गंभीर आरोप केला.
रोषमाळ खुर्दे येथे तर चार महिन्यापासून अंगणवाडी सेविकांनी पोषण आहाराचा माल घेतलेला नाही. धडगांव व अक्कलकुवा तालुक्यात कुपोषण वाढण्यासाठी बालविकास प्रकल्पाधिकारी व सुपरवायझर जबाबदार असून आतापर्यंत एका वर्षात शासनातर्फे ३८ कोटी ८१ लाख २३ हजार ९११ रूपये खर्च करण्यात आले आहे. तरीही धडगांव तालुक्यात १०१७ व अक्कलकुवा ६१४ कुपोषीत बालके आहे. यावेळी ऍड.राम रघुवंशी यांनी कुपोषणाचा विषय गंभीर असून दोषींवर कडक कारवाई करावी. असे सांगितले.
मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी गेल्या एक महिन्यापासून अंगणवाडी सेविकांचे जीओटॅगद्वारे हजेरी घेण्यात येत असल्याचे सांगितले. तर सभापती रतन पाडवी यांनी गेल्या दोन महिन्यात ३ कोटी ५६ लाख ५० हजार २०० रूपये खर्च झाले असतांनाही कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे. याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी महिला बालकल्याण प्रकल्पाधिकारी श्री.राठोड यांनी राज्यातील इतर जिल्ह्यातील अंगणवाडी प्रमाणेच जिल्ह्यातही अंगणवाडीवेळ बदलण्याची मागणी केली. यावेळी जि.प.पदाधिकार्यांनी प्रत्येक तालुक्यातील बालविकास प्रकल्पाधिकारी यांना सभागृहात बोलवून कुपोषण व पोषण आहाराबाबत अधिकार्यांना चांगलेच धारेवरधरले.
जि.प.च्या स्थायी समितीच्या सभेत जि.प.सदस्य विजय पराडके यांनी पशुसंवर्धन विभागात कर्मचार्यांची संख्या कमी असतांनाही त्यांना इतर विभागात वर्ग करण्यात येते. याबाबत नाराजी व्यक्त केली. ऍड.राम रघुवंशी यांनी जिल्ह्यातील लंम्पी आजाराविषयी आढावा घेतला. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सांगितले की, जिल्ह्यात दुसर्या जिल्हांपेक्षा चांगली परिस्थिती आहे. लसीकरणही मोठया प्रमाणावर झाले आहे. त्यावेळी सभापती रतन पाडवी यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यात मोठया प्रमाणात गुरे दगावली आहे. ते कागदवर दिसूनर नसले तरी प्रत्यक्ष शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विजय पराडके यांनी सांगितले की, गुरे मरायला अनेक दिवस झाले. त्यामुळे शासनाच्या निर्णयानुसार कशापध्दतीने पंचनामे करणार असा सवाल केला.
स्थायी सभेत जि.प.सभेत सी.के.पाडवी यांनी सांगितले की, दोन महिन्यापासून मागणीकरूनही काठी येथे शिक्षक नाही तर विजय पराडके यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षापासून धडगांव तालुक्यातील उमरीगव्हाण येथे शाळा इमारत पडली आहे. त्यामुळे खाजगी जागेवर शाळा भरते. यावेळी सभापती रतन पाडवी यांनी सांगितले की, जिल्ह्यात शिक्षकांची रिक्तपदे असतांना अंतरजिल्हा बदली म्हणून १२७ शिक्षकांना बाहेर जिल्ह्यामध्ये पाठविण्यात आले तर नंदुरबार जिल्ह्यात फक्त ५० शिक्षक बदली करून आले आहे. जर रिक्त जागा असतांना शिक्षकांना कार्यमुक्त केलेच कसे असा संतप्त सवाल त्यांनी व्यक्त केला तर उपाध्यक्ष ऍड. राम रघुवंशी यांनी नंदुरबार तालुक्यातील जुनी ओसर्ली येथे एक शिक्षक सतत गैरहजर राहत असून मद्यपान करून शाळेत येत असल्याचे सांगितले संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.








