नंदुरबार l प्रतिनिधी
किटकनाशकांचा सुरक्षित वापर व विषबाधा टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कृषि विभाग तसेच मे.आदामा इंडिया कंपनी प्रा.लि.तर्फे तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक एन.डी.पाडवी, आदामा इंडिया कंपनी प्रा.लि.चे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
नंदुरबार जिल्ह्यासाठी आदामा इंडिया प्रा.लि.या कंपनीची सन 2022-2023 करीता नोडल कंपनी म्हणून निवड झालेली असून कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किटकनाशके हाताळणी व त्यांचा सुरक्षित वापराबाबत शेतकरी प्रशिक्षण, चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांमध्ये फवारणी पंप समवेत किटकनाशके हाताळणी, फेरोमन साफळ्याच्या वापराबाबत मार्गदर्शन,
गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी निष्कर्ष आधारीत फेरोमन साफळ्याच्या आधारे पहिली व दुसरी फवारणी बाबत मार्गदर्शन, तसेच फुलधारणा, आंतरमशागत, शेती बांधणी, पिकाला भर देणे, इत्यादी महत्वपुर्ण विषयासह किटकनाशकांचा सुरक्षित वापर व विषबाधा टाळण्यासाठी प्रचारवाहनाद्वारे प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.








