नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील गेंदाहून धडगाव कडे येणाऱ्या खाजगी प्रवासी वाहन जीप गाडीने बिलगाव खर्डी गावाजवळ स्कुटी चालक सिंग्या पावरा रा. राजबर्डी याला जबर धडक दिल्याने गंभीर जखमी झाला आहे.
अपघात एवढा भीषण होता की जीप गाडीने स्कुटी चालकाला धडक दिल्यानंतर स्कुटी वाहन थेट चार चाकी वाहनाच्या खालून फरपटत नेल्याने चक्काचूर झालं आहे.

प्रत्यक्ष दर्शींच्या माहितीनुसार दुर्गम भागातील अति तीव्र वळण रस्त्यावरील झाडाझुडपांमुळे समोरून येणारी गाडी न दिसल्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती दिली आहे.
अपघातातील विचित्र प्रकार म्हणजे जीप गाडीच्या वरती बसलेले चार ते पाच प्रवासी प्रवासी अपघातानंतर खाली खुदल्याने किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. स्थानिक नागरिक व प्रवासी यांनी अपघातातील जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत कार्य केले.
धडगाव ते बिलगाव दरम्यान परिवहन विभागाची दिवसभरातून एकच बस फेरी असल्याने गेंदा, माल, भूषा, सावर्यादिगर, बमाना या गावातील नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून खाजगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे.
दोऱ्या खोऱ्यातील वळण अति तीव्र उतार रस्त्यांमध्ये झाडाझुडपांमुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने अपघात घडत आहे. त्यामुळे वाहन चालकांनी आपली वाहने सावकाश चालवून काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.








