नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कंत्राटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना करार वाढवून देण्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी प्रभाग समन्यवक दिनेश दिलीप भामरे याच्याविरुद्ध लाचलुचपत विभागाने कारवाई करुन नंदूरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,
नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या जीवनोन्नती सुरू अभियानांतर्गत बचत गटांसाठी काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कराराचे नूतनीकरण करुन देणे तसेच त्यांना सोयीच्या ठिकाणी बदली करुन देण्यासाठी दिनेश भामरे यांनी प्रभाग समन्वयकांसाठी बनविण्यात आलेल्या व्हाट्सअप ग्रुपवर १० हजार रुपये जमा करण्याची पोस्ट टाकली होती.
याबाबत १२ ऑगस्ट २०२२ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. संबंधित संशयिताला साक्षीदारांसमक्ष बोलविले. त्यावेळी दिनेश भामरे याने संबंधित तक्रारदाराकडून १० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे दिसून आल्याने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात प्रभाग समन्वयक अंजली नुजा नाईक यांच्या फिर्यादीवरून नंदूरबार शहर पोलिस ठाण्यात त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोनी माधवी वाघ करीत आहेत.








