नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींचा निवडणुक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून काल दि.२ सप्टेंबर रोजी छाननीत सदस्य पदासाठी ४, नामांकन अर्ज बाद ठरविण्यात आले. त्यामुळे आता ७५ ग्रामपंचायतीचा ६१५ सदस्य पदासाठी १ हजार ४४३ तर ७५ लोकनियुक्त सरपंच पदासाठी ३१२ उमेदवार रिंगणात आहे. दि.६ सप्टेंबर रोजी माघारी नंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
नंदुरबार तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींची कोरोनामुळे २०२० पासून मुदत संपून निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यातच शासनाने कोरोनाचे विविध निर्बंध लावण्यात आल्याने निवडणुका लांबविल्या होत्या. दरम्यान ऑगस्टमध्ये निवडणुक आयोगाने नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत केला.
त्यामुळे दि.२४ ऑगस्टपासून ७५ ग्रामपंचायतींसाठी लोकनियुक्त सरपंच पदासाठी अर्ज दाखल करण्याची सुरूवात झाली होती. नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या ६१५ पदासाठी १ हजार ४४७ तर ७५ लोकनियुक्त सरपंच पदासाठी ३१२ नामांकन अर्ज शेवटच्या दिवसापर्यंत दाखल झाले होते. दरम्यान काल दि.२ रोजी नामनिर्देशन पत्र नंदुरबार येथील वखार महामंडळ येथे छाननी करण्यात आली. मात्र रात्री उशिरापर्यंत याबाबत माहिती प्राप्त होवू शकली नाही. यात नंदुरबार तालुक्यातील लोकनियुक्त सरपंचपदासाठी १२ नामनिर्देशन पत्रापैकी सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले. तर सदस्यपदासाठी तर ६१५ सदस्य पदासाठी १ हजार ४४७ अर्जांपैकी ४ नामनिनर्देशनपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. त्यामुळे सदस्यपदासाठी १ हजार ४४३ नांमनिर्देशनत्र दाखल आहे.
अवैध ठरविण्यात आलेल्या अर्जांमध्ये तालुक्यातील आष्टे, नंदपुर, फुलसरे, नांदर्खे या गावातील सदस्यांचा समावेश आहे. तर नंदुरबार तालुक्यातील नंदपुर येथील पुरूषोत्तम हिम्मतराव धनगर यांचे प्रतिज्ञापत्र अपूर्ण असल्याने अर्जबाद करण्यात आला तर तालुक्यातील आष्टे येथील सोनल हिरामण भिल यांचे २१ वर्ष पूर्ण नसल्याने त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला.
तर नंदुरबार तालुक्यातील फुलसरे येथील एकाने वॉर्ड नंबर १ मध्ये महिल राखीव जागा असतांना अर्ज दाखल केल्याने त्याचाही अर्ज नामंजूर करण्यात आला. दरम्यान छाननी प्रसंगी ८ नामांकनावर हरकती घेण्यात आल्या. यात नवागांव १, पातोंडा २, नागसर १, गुजरभवाली १, होळतर्फे हवेली ३ येथील अर्जांवर हरकत घेण्यात आल्याने यावर सुनावणी घेण्यात येणार आहे. दि.६ सप्टेंबर रोजी माघारीची अंतीम तारीख आहे. त्यानंतरच ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट होणार आहे








