नंदुरबार l
जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकर्यांच्या तोंडाशी आलेला घास अतिपावसाने हिरावुन नेला आहे. त्यात पपई, मिरची, कपाशीसारखी पिके अक्षरश: पूर्णपणे खराब झाली. पिके ही अतिपावसामुळे नेस्तानाबुत झाल्याने शेतकर्यांचे कधीही न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकर्यांना त्वरीत आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे महानगर प्रमुख पंडीत माळी यांनी केली आहे. तसे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, आधीच कोविड-१९ या जागतिक महामारीमुळे संपूर्ण जग आर्थिक संकटात असतांना देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्याने कोरोनाचा विचार न करता या जगाला अन्नधान्य, भाजीपाल्याची कधीही कमतरता भासु दिली नाही. त्यातच मागील काही वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या कमी पावसामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात असतांना त्यातच यंदा झालेल्या अतिपावसामुळे शेतकर्यांच्या तोंडाशी आलेले पीक हे खराब झाल्याने संपूर्ण जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजाचे कधीही न भरुन येणारी अपरिमित हानी झाली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार यांनी सदर प्रकरणात लक्ष घालुन संबंधित यंत्रणेला पंचनामे करणेबाबत आदेश देवून, शासनस्तरावर आवाज उठवुन नंदुरबार जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन जिल्ह्यातील शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळवुन द्यावी. ज्या शेतकर्यांचा पीक विमा आहे त्यांना देखील तात्काळ पिक विम्याचा लाभ देणेबाबत संबंधित विमा कंपनीला आदेशित करावे. कारण शेतकर्यांना आगामी सण, उत्सव साजरा करण्यासाठी, दुसरा हंगाम घेण्यासाठी तात्काळ नंदुरबार जिल्ह्यातील शेतकर्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अन्यथा शेतकरी हितासाठी शिवसेनेतर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल व होणार्या विपरित परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर पंडीत माळी, रमेश पाटील, बुधा ठाकरे, विष्णू पाडवी, चंद्रशेखर माळी, शंकर माळी, रविंद्र माळी, कृष्णा माळी, अभिमन्यु माळी, राजेंद्र माळी, वासुदेव माळी, शेख अरमान हाजी हसन, हलवाई सिराजोद्दीन रहिमोद्दीन, सदाशिव माळी आदींच्या सह्या आहेत.








