नंदुरबार l प्रतिनिधी
लघु पाटबंधारे प्रकल्प गढावली ता. तळोदा हे १०० टक्के पूर्ण क्षमतेने भरले असून कोणत्याही क्षणी सांडव्यातून पाण्याचा विसर्ग चालु होऊन पूर येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नदीकाठावरील पाडळपूर, प्रतापपूर व गोपाळपूर या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
नदी व नाला काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.








