नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील माळीवाडा परिसरातील जिल्हा परिषद शाळेजवळ गुन्ह्यातील फरार आरोपीस ताब्यात घेत असतांना पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून धक्काबुक्की करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यातील कर्मचारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश भिमराव सोनवणे व साक्षीदार हे नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ गुन्ह्यातील आरोपी बबलू उर्फ दीपक बुधा माळी यास ताब्यात घेण्यासाठी गेले होते.
यावेळी पोलिसांना पाहून बबलू माळी हा तेथून पळून जात असतांना पाठलाग करुन त्यास अटक करुन घेण्यास सांगितले. त्यावेळी बबलू माळी याने आरडाओरड करुन त्याचे साथीदार विलास माळी (आयशरवाला), निलेश दिलीप माळी, गुलाब माळी व गब्बर भिका माळी सर्व. रा.माळीवाडा ता.नंदुरबार यांना बोलावून जमाव करुन अटकेस विरोध केला.
तसेच विलास माळी याने सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश भिमराव सोनवणे यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. तसेच शासकीय कर्तव्य बजावत असतांना शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात पाचही जणांविरुद्ध भादंवि कलम ३५३, २२४, २२५, १४३, १४७, १४९ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर आहेर करीत आहेत.








